जैन बोर्डिंग व्यवहाराशी संबंध नाही

जैन बोर्डिंग व्यवहाराशी संबंध नाही

Published on

पुणे, ता. १९ : जैन बोर्डिंग वसतिगृहाच्या पुनर्विकासाशी संबंधित व्यवहारावरून होत असलेल्या आरोपांना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी प्रत्युत्तर दिले. ‘‘मी या भागीदारी संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर ११ महिन्यांनी हा व्यवहार झाला आहे. त्यामुळे या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही. माजी खासदार राजू शेट्टी यांनी वस्तुस्थिती पडताळल्यास सत्य समोर येईल,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना मोहोळ म्हणाले, ‘‘सामाजिक-राजकीय क्षेत्रात काम करताना असे निराधार आरोप झाले, तर कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होते. एखाद्याचे करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. पुणेकरांचा खासदार म्हणून माझ्यावरील आरोपांबाबत सत्य मांडणे मला गरजेचे वाटले. जैन बोर्डिंगच्या खरेदीखताचा व्यवहार गोखले बिल्डर्सने केला असून, त्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही. केंद्रात मंत्री झाल्यानंतर भागीदारी करता येत नाही, त्यानुसार २५ नोव्हेंबर २०२४ रोजी मी राजीनामा दिला. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये ट्रस्टने पुनर्विकासाचा निर्णय घेतला आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये गोखले बिल्डर्ससोबत करार झाला. मग यात माझा संबंध कसा येईल?’’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, ‘‘जैन बांधवांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना मदत कशी करता येईल, हा माझा नेहमी प्रयत्न असतो.’’
राजू शेट्टी यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मोहोळ म्हणाले, ‘‘त्यांना चुकीची माहिती देण्यात आली. त्यांनी शहानिशा न करता आरोप केले. खरी कुस्ती आणि नूरा कुस्ती यातला फरक पुणेकर आणि कोल्हापूरकर चांगले ओळखतात. शेट्टी हे नूरा कुस्तीचे खेळाडू वाटतात.’’
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत ते म्हणाले, ‘‘शेट्टींनी आरोप केल्यानंतर काही वैफल्यग्रस्त लोक आरोप करत आहेत. निवडणुकीतही अशाच पातळीवरील टीका झाली होती. पण मी तेव्हाही मौन बाळगले होते, आताही बोलणार नाही.’’

युती अन् खेळ हा वेगळा विषय
‘‘ऑलिंपिक समितीच्या निवडणुकीत मी, उपमुख्यमंत्री अजित पवारही आहेत. राज्यातील युती आणि खेळ हा वेगळा विषय आहे. मात्र, ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात होईल,’’ असेही त्यांनी नमूद केले.

गुन्हेगारी खपवून घेणार नाही
मोहोळ म्हणाले, ‘‘पुण्याचे नाव बदनाम होईल, असे प्रकार घडू नयेत. पोलिसांकडून योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी मी सतत पोलिस आयुक्तांच्या संपर्कात आहे. गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com