दिवाळी अंक
स्वागत दिवाळी अंकांचे
१) आपले छंद
‘आपले छंद’ चा यंदा ‘घर’ हा विशेषांक आहे. ‘घर’ या आपुलकीच्या विषयाचे अनेक पैलू दर्शविणारे लेख आणि निवडक कविता यात आहेत. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांचा मराठीच्या अभिजात दर्जासंदर्भातील ‘दर्जा अभिजात...लढाई अस्तित्वाची’ या लेखाचा अपवाद वगळता बाकी सर्व लेख अन् कविताही ‘घर’ या विषयावर आहेत. प्रसिद्ध लेखक भारत सासणे, रवींद्र शोभणे, लक्ष्मीकांत देशमुख, अशोक बागवे, प्रदीप निफाडकर, संजीव साबडे, प्रा. मिलिंद जोशी, गणेश मतकरी, समीर गायकवाड, रवींद्र गुजर, संदीप तापकीर यांचे ‘घर’ या विषयावरील विविध पैलू उलगडणारे लेख, ललित लेख वाचनीय झाले आहेत. टपाल तिकिटांवरील घरे, पक्ष्यांची घरटी, घरांवरील गाणी, घरांच्या आठवणी आदी विविधांगी साहित्याने हा अंक वाचनीय झाला आहे.
संपादक : दिनकर शिलेदार
पाने : २४४, किंमत : ४०० रुपये
फोटो ः 61450
२) शब्दाई पत्रिका
मान्यवरांचे लेख, कथा, कविता यांनी यंदाचा अंक सजला आहे. आगामी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आपल्या कादंबरीतील नायिकांवर लिहिले आहे. बहिणाबाईंच्या कवितांवर प्रा. प्रवीण दवणे, विठुराया आणि आषाढी वारीवर मधुकर भावे यांनी लिहिले आहे. बाबा आढाव यांच्यावर लक्ष्मण गायकवाड यांनी लेख लिहिला आहे. राज कपूरविषयीच्या आठवणींना इंद्रजित भालेराव यांनी उजाळा दिला आहे. त्याचबरोबर प्रा. डॉ. यशवंत पाटणे, आनंद देशमुख, डॉ. शमसुद्दीन तांबोळी, डॉ. श्यामा घोणसे, डॉ. प्रिया निघोजकर आदींचे लेख आहेत. ‘रुसलेली बायकोची मनधरणी’ ही सु. ल. खुटवड यांची विनोदी कथा आहे. संजय सोनवणी, प्रा. ऐश्वर्य पाटेकर, विलास सिंदगीकर, संजय ऐलवाड यांच्या कथा आहेत. फ. मु. शिंदे, सुधाकर गायधनी, प्रा. अशोक बागवे, रमण रणदिवे, अंजली कुलकर्णी, ज्योत्स्ना चांदगुडे, अनिल गुंजाळ, बालिका ज्ञानदेव आदींच्या कविता आहेत.
संपादक ः स्वाती पिंगळे, पाने ः २१६, किंमत ः ३०० रुपये
३) विद्यार्थी हित
विचारातून विकासाकडे हे उद्दिष्ट ठेवून या अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘शिक्षणाने शहाणपण येते का?’ यावरील परिसंवादात प्रवीण दवणे, डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. न. म. जोशी, दिलीप फलटणकर यांनी लेखन केले आहे. उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमके काय आणि कसे शिकावे, माजी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, वीणा कामत, हेरंब कुलकर्णी, डॉ. दीपक शिकारपूर यांनी मार्गदर्शन केले आहे. परकीय भाषाशिक्षण माणूस म्हणून आपल्याला कसे समृद्ध करते, हे अनघा भट- बेहेरे यांनी मांडले आहे, तर इंग्रजी माध्यम ही सध्याची अपरिहार्यता आहे का याचा ऊहापोह शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्रुती चौधरी यांनी केला आहे. याशिवाय हेमचंद्र शिंदे, प्राजक्ती गोखले, प्रा. मंगेश तांबे, आनंद सराफ, आनंद देशमुख, प्रकाश बोकील, माधव राजगुरू, प्रतीक येतावडेकर यांचे लेख आहेत. बालपणीची आठवण मूर्ती अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी जागवली आहे. डॉ. संगीता बर्वे, स्वप्ना अमृतकर, फारुक काझी, आश्लेषा महाजन, भारती सावंत आदींच्या कथा आहेत.
संपादक ः चंद्रकांत कुलकर्णी, पाने ः १५२, किंमत ः २०० रुपये.
४) पुणे पोस्ट
‘आम्ही मध्यमवर्गीय’ हा विशेष विभाग हे यंदाच्या अंकाचे वैशिष्ट्य आहे. मध्यमवर्गीयांच्या जीवनाचे विविध कंगोरे मांडणारे लेखन नंदिनी आत्मसिद्ध, नीती मेहेंदळे, संजय भास्कर जोशी, डॉ. नंदू मुलमुले, डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी केले आहे. लक्ष्मीकांत देशमुख, उत्कर्षा सुमीत, महावीर जोंधळे यांच्या कथांचा, तर काव्यस्पंदन विभागात अंजली कुलकर्णी, रमजान मुल्ला यांच्या रचना आहेत. याशिवाय कवितेच्या स्वतंत्र विभागात रमण रणदिवे, प्रशांत असनारे, अशोक कौतिक कोळी, शशिकांत हिंगोणेकर यांच्या कविता आहेत. डॉ. नंदू मुलमुले यांनी इराणी सिनेमावर लेख लिहिला
आहे. मधुकर धर्मापुरीकर यांनी व्यंग्यचित्रांवर आस्वादपर लेख लिहिला आहे.
संपादक : प्रदीप खेतमर, अमृता खेतमर, पाने : १६८, किंमत : ३०० रुपये
---
५) शब्दगंधार
‘जिवलग मैत्री आठवताना’ या विषयावर १०० हून अधिक लेखक व मान्यवरांनी आपल्या भावना यंदाच्या ‘शब्दगंधार’च्या अंकात व्यक्त केल्या आहेत. डॉ. अनिल रोंधे, स्नेहल बाकरे, प्रभा डांगे, श्रीकृष्ण केळकर आदींसह इतर अनेक लेखकांच्या हृदयस्पर्शी कथा अंकात आहेत. कविता विभागात रमा दीक्षित, अमित सोमण, आनंद देशमुख, अशोक भांडे, हेमंत परब यांच्यासह इतर कवींच्या रचना आहेत. चारुशीला बेलसरे यांनी आपल्या संगीतमय वाटचालीवर लेख लिहिला आहे, तर शुभांगी पासेबंद यांनी जुन्या नाण्यांची माहिती दिली आहे. शुभांगी शिंदे यांनी भारतीय संस्कृतीची प्रतीके यावर लेख लिहिला आहे.
संपादक : डॉ. अरविंद नेरकर, चारुशीला बेलसरे, पाने : १५२, किंमत : ३०० रुपये
----
६) किस्त्रीम
कथा, कविता, लेख, परिसंवाद अशा विविध विभागांनी ‘किस्त्रीम’चा अंक सजला आहे. ‘खास लेख’ विभागात सेक्युलर भारताचे भवितव्य यावर सारंग दर्शने यांनी आपलं चिंतन मांडलं आहे. ॲड. सुशील अत्रे यांनी ‘संघेत शरदः शतम’ हा लेख लिहिला आहे. ‘वैचारिक - सामाजिक’ विभागात चंद्रशेखर मुरगुडकर, दीपक चैतन्य, भालचंद्र देशमुख, श्यामसुंदर मुळे यांच्या लेखांचा समावेश आहे. सुजाता तांडेल, माधव गवाणकर, किशोर तरवडे, महेश सोवनी यांच्या आशयघन कथा अंकात आहेत. ‘स्मरण’ विभागात प्रवीण दवणे यांनी बहिणाबाईंवर, प्रा. प्रतिमा अग्निहोत्री यांनी गुरुदत्तवर, तर भारती सावंत यांनी अहिल्याबाई यांच्यावर, तर मिलिंद जोशी यांनी जगदीश खेबुडकर यांच्यावर लेख लिहिला आहे. विश्वास वसेकर, अनुराधा काळे, आनंद पेंढारकर, आश्लेषा महाजन यांच्यासह इतर कवींच्या रचना कविता विभागात आहेत.
संपादक : विजय लेले, पाने ः २७२, मूल्य : ३०० रुपये