झळाळी आल्याने गुंतवणूकदारांची ‘चांदी’ ११ ते १४ ऑक्टोबरदरम्यान तब्बल १७ हजार रुपयांची वाढ
पुणे, ता. २० ः दिवाळीचा उत्साह वाढत असताना सराफ बाजारात सोन्याबरोबरच चांदीनेही तेजी दाखवली आहे. गेल्या दहा दिवसांतील आकडेवारी पाहता चांदीच्या भावाने मोठी झेप घेतली आहे. ११ ऑक्टोबरला प्रति किलो १ लाख ६६ हजार रुपये असलेली चांदी १४ ऑक्टोबरला तब्बल १ लाख ८३ हजार रुपयांवर पोचली. केवळ तीन दिवसांत तब्बल १७ हजार रुपयांची वाढ झाली. त्यानंतर काही दिवस किंचित घट झाली असली तरी १९ आणि २० ऑक्टोबरपर्यंत भाव पुन्हा १ लाख ७१ हजार रुपयांच्या आसपास स्थिरावले आहेत.
या कालावधीत सोन्याचे भावही वाढले आहेत. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ११ ऑक्टोबरला १ लाख २२ हजार ९१७ रुपये होता, तर १७ ऑक्टोबरला तो १ लाख ३० हजार ७९५ रुपयांवर पोहोचला. चांदी ही केवळ दागिन्यांपुरती मर्यादित नसून, तिचा वापर औद्योगिक क्षेत्रातही वाढला आहे. इलेक्ट्रॉनिक चिप्स, ईव्ही, सौरऊर्जा पॅनेल, औषधनिर्मिती, तसेच सजावटीच्या वस्तूंमध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे जागतिक स्तरावरही चांदीची मागणी वाढली आहे. या वाढत्या मागणीचा परिणाम भारतीय बाजारातही स्पष्टपणे दिसून आला आहे.
गुंतवणूकदार खूष ः
यंदा जानेवारीपासून सोन्यासह चांदीचे भावदेखील वाढत आहेत. त्यामुळे चांदीत गुंतवणुक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चांदीने ‘सोन्याहून उजळ’ कामगिरी करत गुंतवणूकदारांना आनंदित केले आहे. दिवाळीतील ही तेजी बाजारातील चैतन्य आणखी वाढवणारी ठरली आहे.
१४ ऑक्टोबरला विक्रमी भाववाढ ः
१३ ऑक्टोबरला चांदीचा भाव प्रति किलो १ लाख ७३ हजार ५०० रुपये होता. फक्त एका दिवसात म्हणजे १४ ऑक्टोबरला तो तब्बल ९ हजार ५०० रुपयांनी वाढून १ लाख ८३ हजार रुपयांवर पोचला. एका दिवसात एवढी प्रचंड वाढ यावर्षी प्रथमच नोंदवण्यात आली असून, सराफ बाजारात त्याने चांगलीच खळबळ उडवली. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जागतिक बाजारातील तत्काळ मागणी व चलनातील अस्थिरतेमुळे ही वाढ झाली.
ऑक्टोबरमधील सोने आणि चांदीचे भाव (रुपयांत) ः
तारीख - २४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) - २२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) - चांदी प्रति किलो
११ - १,२२,९१७ - १,१३,१८१ - १,६६,०००
१२ - १,२३,७२५ - १,१३,९२५ - १,६७,०००
१३ - १,२४,१८० - १,१४,३४४ - १,७३,५००
१४ - १,२६,२५० - १,१६,२५० - १,८३,०००
१५ - १,२७,३६१ - १,१७,२७३ - १,७९,०००
१६ - १,२७,८६६ - १,१७,७३८ - १,७४,०००
१७ - १,३०,७९५ - १,२०,४३५ - १,७६,०००
१८ - १,२८,६७४ - १,१८,४८२ - १,६६,०००
१९ - १,२८,६७४ - १,१८,४८२ - १,७१,०००
२० - १,२७,४६२ - १,१७,३६६ - १,७१,०००
(स्रोत - कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स)
‘‘दिवाळीपूर्वी चांदीत गुंतवणुकीचा कल वाढला आहे. औद्योगिक मागणीसह ग्राहकांकडूनही प्रतिसाद मिळतो आहे. सणासुदीचा हंगाम असल्याने अलंकारिक व धार्मिक चांदीच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. १४ ऑक्टोबरच्या वाढीनंतर काही दिवस भाव कमी झाले असले तरी ते फक्त स्थिरतेकडे जाण्याचे लक्षण आहे. जागतिक बाजारातील घडामोडी, डॉलरची स्थिती आणि कच्च्या धातूंच्या उपलब्धतेनुसार चांदीचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आत्ता चांदीचे बार आणि नाणी खरेदी वाढली आहे.’’
अतुल अष्टेकर, भागीदार, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.