दिवाळी अंक

दिवाळी अंक

Published on

स्वागत दिवाळी अंकाचे
--------------------
१) पालकनीती
पालकत्वाला वेगळे परिमाण देत असलेल्या पालकनीती दिवाळी अंकाने यंदाही परंपरा कायम राखली आहे. मुळात पैसा आपल्या आयुष्यात अनेकविध अर्थाने महत्त्वाचा असतो. त्याचा आधार घेत यंदाच्या अंकात अनोखी मांडणी केली आहे. अगदी मुखपृष्ठापासून याची जाणीव होते. रूपयाच्या बोधचिन्हाला निबचा आकार देत योग्य झिरपणारे विचार अंकातून वाचायला मिळतात. ज्येष्ठ चित्रकार रमाकांत धनोकर यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ अफलातून आहे. पाल्य, पालक, पालकत्व आणि पैसे असे पाच ‘प’ अप्रतिम पद्धतीने अंकातून मांडले आहेत. याशिवाय अंकाच्या शेवटी एक धम्माल खेळही दिला आहे. या अंकात मुक्ता चैतन्य, डॉ. नंदू मुलमुले, राजीव तांबे, डॉ. रामदास महाजन यांच्यासह विविध मान्यवरांनी लेखन केले आहे.
संपादक ः संजीवनी कुलकर्णी, पाने ः ८८, किंमत ः १५० रुपये
फोटो ः ६१७६४
-------
२) मनःशक्ती
साधना हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर अध्यात्म येते. अध्यात्मात साधनेचे अपरंपार महत्त्व आहे. उच्च ध्येय साध्य करण्यासाठी केलेले परिश्रम, संयम, सातत्यपूर्ण केलेले अथक प्रयत्न म्हणजेही साधनाच असते. कार्यसाधना ही संकल्पना घेऊन यंदाचा मनःशक्तीचा अंक सजला आहे. कार्यसाधना म्हणजे ‘कामाचे तप.’ या अंकातील लेखांमध्ये विविध कर्तबगारांची उज्ज्वल कार्यसाधना वाचकांना अनुभवता येणार आहे. स्वामी विज्ञानानंद यांच्या लेखमालेसह गीतकार प्रवीण दवणे, शि. द. फडणीस, यास्मीन शेख यांचा प्रेरणादायी प्रवास वाचकांसमोर ठेवला आहे. विविध विषयांवरील वैशिष्ठ्यपूर्ण लेखांसह अंकामध्ये बहारदार कथा आहेत. या अंकातील लेख वाचताना वाचकांना स्वतःच्या जीवनातील साधनेचे धागे शोधता येणार आहेत.
मुख्य संपादक ः श्रीहरी कानपिळे, संपादक ः डॉ. वर्षा तोडमल, पाने ः २२०, किंमत ः २०० रुपये
फोटो ः ६१७६३
------
३) शुभम
लेख, कथा, प्रवासवर्णन, कविता, वात्रटिका, पाककृती, बालकुमार अशा विविध विभागांतून भरगच्च वाचनीय मजकूर या अंकात देण्यात आला आहे. श्रीपाल सबनीस, आनंद देशमुख, ॲड. प्रताप परदेशी, झेलम चौबळ, डॉ. मिलिंद भोई, राजेश पाटील आदींचे विविध विषयावरील लेख आहेत. सु. ल. खुटवड, उद्धव भयवाळ, उत्तम सदाकाळ, सचिन बेंडभर, उदय जोशी, सुधीर आपटे यांच्या कथांनी अंक सजला आहे. महेंद्र फाटे यांनी लहान मुलांसाठी विनोदाची सफर घडवून आणली आहे. डॉ. कैलास दौंड, प्रमोद रोहणकर, सुनील राऊत आदींनी लहान मुलांसाठी लेखन केले आहे.
संपादक ः मनीषा फाटे, पाने ः १९६, किंमत ः ३०० रुपये
फोटो ः ६१७६०

४) पत्रभेट - भेट सद्‍गुरूंची
--------------
आपण आपापल्या पद्धतीने आनंदाची व्याख्या करू शकतो. आनंदाच्या शोधासाठी प्रत्येक जण झटत असतो. माणसाचे आनंद मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी दरवर्षी सण-उत्सव साजरे करण्याची आपली परंपरा आहे. या आनंदाचा उगम झाला ती भार्गवभूमी म्हणजे कोकण. यंदाच्या ‘पत्रभेट-भेट सद्‍गुरूंची’ दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणातील लेखकांनी केलेले लिखाण. शुद्ध, निखळ आणि सकारात्मक ते सारे आध्यात्मिक या विचाराने अनेकविध विषय या अंकात हाताळले आहेत. कोकणातील महापुरुषांची चरित्रे या अंकातून विस्तृतपणे सर्वांसमोर येणार आहेत. विनिता तेलंग, सुरेश वंदिले, डॉ. संगीता बर्वे यासह विविध मान्यवरांच्या लेखांनी अंक सजला आहे.
संपादक ः अपूर्वा मार्डीकर, पाने ः १७२, किंमत ः २०० रुपये.
फोटो ः ६१७६५
-----------------
५) उत्कर्ष

पुण्याच्या प्रकाशन आणि पुस्तकविक्री क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे उत्कर्ष. या नावाला साजेसा दिवाळी अंक संस्थेने काढला आहे. कथा, विशेष लेख, व्यक्तिचित्रे, मुलाखती असा भरपूर वाचनीय मजकूर यात आहे. डॉ. गो. बं. देगलूरकर, मंगला गोडबोले, रविमुकूल, आनंद माडगूळकर, विजय कुवळेकर, माधवी वैद्य, हिनाकौसर खान, नीतिन वैद्य, दिलीप प्रभावळकर, अस्मिता व्यास, सविता जोशी, स्वप्नील पोरे, महेश सोवनी, प्रवीण दवणे आदींचे लेखन ही वाचकांना पर्वणीच वाटेल.
संपादक ः नीलिमा जोशी वाडेकर, पाने ः २६४, किंमत ः ४०० रुपये.
फोटो ः ६१७६१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com