साखर कारखान्यांत २० पर्यावरणपूरक उपपदार्थ

साखर कारखान्यांत २० पर्यावरणपूरक उपपदार्थ

Published on

नरेंद्र साठे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २१ ः साखर कारखान्यांचा गाळप हंगाम कमी झाल्याचा फटका उत्पादनावर आणि आर्थिक परिस्थितीवर होत आहे. बदलत्या परिस्थितीत उसाचा प्रत्येक कण वापरून सुमारे २० उपपदार्थ तयार करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथे मागील तीन वर्षांपासून संशोधन सुरू आहे. या संशोधनाच्या आधारे ‘व्हीएसआय’ने सविस्तर आराखडा तयार केला असून, साखरेच्या मुख्य उत्पादनाला स्पर्धा न करता कारखाने पर्यावरणपूरक उपपदार्थ तयार करू शकतील.
‘व्हीएसआय’मधील मद्यार्क आणि जैवइंधन तंत्रज्ञान विभागाने उसावर आधारित ‘जैविक शुद्धीकरण केंद्र’ ही संकल्पना पुढे आणली आहे. उसाच्या प्रत्येक घटकाचा उपयोग होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात कारखान्यांमध्ये मळी, प्रेसमड आणि बगॅसपासून जैवइंधने, जैवरसायने तसेच मूल्यवर्धित उत्पादने तयार होणार आहेत. या संदर्भात ‘व्हीएसआय’ने आराखडा तयार केला असून, काही उत्पादनांवर काम सुरू आहे, तर काही उत्पादनांच्या निर्मितीवर लवकरच काम होणार आहे. याबाबत मद्यार्क आणि जैवइंधन तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. काकासाहेब कोंडे म्हणाले, ‘‘सीएनजीसाठी आवश्यक पूरक घटक प्रेसमडमधून तयार केला जात आहे. काही कारखान्यांनी याचे प्रकल्पही राबवले आहेत. पण प्रेसमडमधून केवळ सीएनजी तयार करून चालणार नाही; त्यात सुमारे १० टक्के मेण असते. त्याचे मेण काढण्याचाही आम्ही अभ्यास केला आहे. मेण काढल्यानंतर सीएनजी आणि उरलेला घटक शेतासाठी खत म्हणून उपयोगी ठरणार आहे. मेणाचा वापर सध्या सौंदर्यप्रसाधने, कार पॉलिश, बूट पॉलिश यांसाठी होतो. यावर अधिक संशोधन करून ‘व्हीएसआय’मध्ये प्रायोगिक प्रकल्प राबविण्याचा आमचा मानस आहे.’’

ऊस आधारित जैविक उद्योग संकुल
साखर उद्योगाचे रूपांतर शाश्वत ऊर्जेच्या आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या केंद्रात करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. त्यासाठी ‘व्हीएसआय’मध्ये ऊस आधारित जैविक उद्योग संकुल विकसित करण्यात येणार आहे. या संकुलात होणाऱ्या प्रात्यक्षिक प्रकल्पांमुळे व्यावसायिक उत्पादनापूर्वी विविध तंत्रज्ञानाचे तांत्रिक आणि आर्थिक मूल्यांकन करण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर साखर कारखान्यांतील मनुष्यबळाला प्रशिक्षण देणे, उद्योगातील व्यावसायिकांना एकत्र आणणे आणि इतर संशोधन संस्थांबरोबर सहकार्य वाढविणे शक्य होणार असल्याचे ‘व्हीएसआय’कडून सांगण्यात आले.

उसापासून सुमारे २० उपपदार्थ उसापासून तयार करता येणे शक्य आहे, त्यावर ‘व्हीएसआय’ने आराखडा तयार केला आहे. त्यातील काही उत्पादने तयार केले जात आहेत. उत्पादन तयार झाल्यानंतर कारखाने ते स्वीकारतील. उसाच्या भविष्यासाठी प्रत्येक कण हा वापरून जास्तीत जास्त त्याचे मूल्य वाढविण्यासाठी प्रयत्न आहे. ‘सर्क्युलर इकॉनॉमी’ म्हणजे जे मातीतून मिळते ते पुन्हा मातीमध्ये जाणे आवश्यक आहे. या उत्पादनांमुळे साखरेला कुठेही स्पर्धा होत नाही, कारण ही उत्पादने साखर तयार झाल्यानंतर उरलेल्या घटकांपासून बगॅस, प्रेसमड केक आणि मळीपासून तयार केली जातील. गरज भासल्यासच साखरेचा वापर होईल.
- डॉ. काकासाहेब कोंडे, विभाग प्रमुख, मद्यार्क आणि जैवइंधन तंत्रज्ञान, व्हीएसआय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com