खड्डे, रस्ते दुरुस्ती जोरात

खड्डे, रस्ते दुरुस्ती जोरात

Published on

पुणे, ता. २३ ः पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाने खड्डे व रस्ते दुरुस्तीसाठी सुरुवात केली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महापालिकेच्या डांबर प्लांटमधून गरम डांबर उपलब्ध होऊ लागल्याने शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये खड्डे बुजविण्याचे काम वेग धरू लागले आहे. याबरोबरच वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून खड्डे, रस्ते दुरुस्ती व पॅचवर्कची कामे केली जात आहेत. आत्तापर्यंत तीन हजार ३३१ खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत.
शहरामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या पथ विभागाकडून पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र दरवर्षीच्या तुलनेत पावसाळ्याच्या काही दिवस अगोदरच शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पथ विभागाने केलेल्या कामांवर पाणी फेरले. अनेक मुख्य रस्त्यांवर पावसाळी वाहिन्या, सांडपाणी वाहिन्या तुंबल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाली. रस्त्यांच्या दुरवस्थेचे वृत्त प्रसिद्ध करत ‘सकाळ’ने त्यावर प्रकाश टाकला होता. दरम्यान, महापालिकेच्या पथ विभागाने खड्डे व रस्ते दुरुस्तीच्या कामाला वेग दिला. शुक्रवारी पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली. त्यामुळे डांबर उपलब्ध होऊ शकल्याने खड्डे, रस्ते दुरुस्तीच्या कामाला पथ विभागाकडून गती देण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील रस्त्यांवर महापालिकेच्या रस्ते देखभाल-दुरुस्ती व्हॅनसह पथकांद्वारे खड्डे व रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

पाच प्रकारच्या उपाययोजना
- पावसाळ्यात खडी ओली झाल्याने गरम डांबर मिळण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी डांबर उपलब्ध न झाल्याने खड्डे, रस्ते दुरुस्तीला विलंब होतो. मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर डांबर प्लांटमधून अधिकाधिक गरम डांबर मिळवून महापालिकेच्या पथ विभागाकडून खड्डे बुजविले जातात.
- सुके डांबर असलेल्या कोल्डबॅगचा वापर करूनही खड्डे दुरुस्तीवर भर दिला जात आहे.
- काँक्रिट व केमिकल काँक्रिट या आणखी दोन पद्धतीने खड्डे व रस्ते दुरुस्तीचे काम केले जात आहे.
- अनेक ठिकाणी गरम डांबर, काँक्रिट किंवा कोल्डमिक्‍सचा वापर करूनही मोठे खड्डे बुजविणे शक्‍य होत नाही. त्या ठिकाणी पथ विभागाकडून चार इंचाचे पेवर ब्लॉक खड्ड्यांमध्ये टाकून त्यावर खडी, डांबर किंवा काँक्रिट टाकून रस्ते दुरुस्त करण्याचे काम केले जात आहेत.
- कात्रज कोंढवा रस्त्यासह अनेक रस्त्यांवर पावसाळी वाहिन्या नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साठून तेथे खड्डे तयार होतात. अशा मोठ्या खड्ड्यांच्या ठिकाणी पेवर ब्लॉकचा वापर करून ते बुजविले जात आहेत.
- मोठे खड्डे असल्यास आवश्‍यक त्या ठिकाणी ठिकाणी पॅचवर्क करून संबंधित खड्डे पूर्णपणे बुजविले जात आहेत.

दृष्टिक्षेपात
- खड्डे व रस्ते दुरुस्तीसाठी वापरलेला माल - १२ हजार २५७ टन
- आत्तापर्यंत करण्यात आलेले डांबरीकरण - १८ हजार २३५ चौरस मीटर
- शहरातील खड्ड्यांची संख्या - ३ हजार ३७७
- दुरुस्त करण्यात आलेले खड्डे - ३ हजार ३३१
- काम करणे शिल्लक असलेले खड्डे - ४६
- रस्त्यावरी उचललेले किंवा दुरुस्त केलेले चेंबर - ३८८
- रस्त्यांवर पाणी साठणाऱ्या ठिकाणांची दुरुस्ती - १२५

शहरात आत्तापर्यंत तीन हजारांहून अधिक खड्डे बुजविले आहेत. पावसाळ्यात गरम डांबर उपलब्ध होण्यास अडचण येते. तरीही, अन्य पर्यायांचा वापर करून खड्डे व रस्ते दुरुस्ती केली जात आहे. पावसाने उघडीप दिल्यास डांबर प्लांटमधून गरम डांबर घेऊन खड्डे बुजविले जात आहेत. मोठे खड्डे असणाऱ्या रस्त्यांवर पेवर ब्लॉकचा वापर करून दुरुस्ती केली जात आहे.

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com