विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत उदासीनता

विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत उदासीनता

Published on

पुणे, ता. २५ ः महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची ने-आण करणाऱ्या ‘पीएमपीएल’ बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचा प्रस्ताव मागील वर्षी मांडण्यात आला होता. वर्ष संपत आलेले असतानाही महापालिका प्रशासनाने अजूनही महिला सुरक्षारक्षक नेमण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही महापालिका प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही.
बदलापूर येथे शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना, त्यानंतर पुण्यातील स्वारगेट येथे तरुणीवरील अत्याचार, तसेच एका खासगी शाळेमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देण्यात आला होता. त्यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसमध्ये महिला मदतनीस किंवा महिला सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार, नव्या शैक्षणिक वर्षात जून महिन्यापासून विद्यार्थ्यांसाठी ही सेवा देण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते, मात्र अजूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सुरक्षा रक्षक नेमण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडून त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर संबंधित प्रस्ताव विविध विभागांकडे पाठविण्यात आला. दरम्यान, विद्यार्थ्यांची संख्या, आर्थिक तरतुदीसह विविध प्रकारचे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. विविध तांत्रिक कारणे पुढे करत अजूनही प्रस्तावाबाबत महापालिका प्रशासनाकडून चालढकलपणा सुरुच आहे. शाळा सुरू होऊन सहा महिने उलटले, तर शैक्षणिक वर्ष संपण्यास सहा महिने शिल्लक आहेत. त्यामुळे आता तरी, महापालिका प्रशासन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर होऊन महिला सुरक्षा रक्षक नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करणार का? एखादी अनुचित घटना घडल्यावरच महापालिका प्रशासनाला जाग येणार आहे? असे प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

विद्यार्थ्यांबाबत नियमांचे उल्लंघन
खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस, स्कूल व्हॅनमध्ये महिला मदतनीस ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार, बहुतांश खासगी शाळा, विद्यालये त्यांच्या स्कूल व्हॅन, स्कूल बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक ठेवण्यास प्राधान्य देतात. प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) शाळांच्या बस, व्हॅनची वेळोवेळी तपासणी करून संबंधितांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही, याची तपासणी केली जाते. या उलट महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसमध्ये महिला सहाय्यक/महिला सुरक्षारक्षक नाहीत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत असंवेदनशील असलेल्या महापालिका प्रशासनाकडूनच नियमांचे उल्लंघन केले जात आहे. मात्र विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या ‘पीएमपीएल’ बसची तपासणी होत नाही आणि या बसवर कारवाई करण्याचे धाडसही केले जात नाही अशी सद्यःस्थिती आहे.

महत्त्वाचे
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनीची ने-आण करणाऱ्या बस - ६८
शिक्षण विभागाकडून महिला सहाय्यक/सुरक्षारक्षकांची केलेली मागणी - ६८
शाळांच्या पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या - ३४००

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या ‘पीएमपीएल’ बसमध्ये महिला साहाय्यक महिला सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत शिक्षण मंडळाने मागणी सुरक्षा विभागाकडे मागणी केली होती. त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून पाठविला. मात्र विविध तांत्रिक कारणांमुळे प्रस्ताव मंजूर झालेला नाही.
- राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com