

पुणे, ता. २५ ः पुणे महापालिकेतर्फे १६९ कनिष्ठ अभियंता भरतीसाठी एक डिसेंबर रोजी राज्यातील सुमारे २० केंद्रावर परीक्षा होणार आहे. पण दोन डिसेंबर रोजी नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान असल्याने ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी केली जात होती. मात्र, महापालिकेने ही मागणी फेटाळून लावत ठरलेल्या वेळेनुसार राज्यभरात परीक्षा पार पाडली जाईल असे स्पष्ट केले आहे.
गेल्या जवळपास पावणेदोन वर्षापासून महापालिकेची ही कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा होत आहे. यासाठी सुमारे ४२ हजार उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. राज्यातील २० शहरात ही परीक्षा होणार आहे. पण राज्यात २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या अर्ज करणाऱ्यांमध्ये नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांचा समावेश आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने त्यांना परीक्षेसाठी सुट्टी मिळणार नाही. तसेच २३ हजार जणांनी पुणे हे परीक्षा केंद्र दिले होते, पण पुण्यात एकाच वेळी साडेआठ हजार जणांची परीक्षा घेणे शक्य आहे. त्यामुळे इतरांना अन्य शहरात परीक्षा केंद्र दिल्याने त्याविरोधात तक्रार केली आहे. अनेक लोकप्रतिनिधींनीही यावर आक्षेप घेतला आहे.
उमेदवारांच्या तक्रारी आलेल्या आहेत, पण महापालिकेतर्फे कनिष्ठ अभियंतापदाची परीक्षा ठरलेल्या दिवशी होणार आहे. आमची पूर्ण तयारी झाली आहे. नगरपालिका, नगर परिषदेत काम करणाऱ्या अभियंत्यांनी निवडणूक आयोगाकडे विनंती केल्यास त्यांना सुट्टी मिळू शकते. पर्यायी मनुष्यबळाची व्यवस्था होऊ शकते.
- विजयकुमार थोरात, उपायुक्त, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.