विमानतळ प्रशासनाला बिबट्याचा धसका

विमानतळ प्रशासनाला बिबट्याचा धसका

Published on

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २६ ः पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्याचे वारंवार दर्शन घडल्यानंतर विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. यात शिडीची (लॅडर) सेवा बंद केली आहे. तसेच, ऍप्रन सुरक्षा पथकाला दर अर्ध्या तासांनी प्रवासी असलेल्या भागांत गस्त घालण्याचे आदेश दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही महत्त्वाच्या ठिकाणी विजेची व्यवस्था केली आहे. शिवाय ऍप्रनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकट्याने न जाण्याच्या सूचना विमानतळ प्रशासनाने दिल्या आहेत.
पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ मागच्या आठवड्यात तीन वेळा व मंगळवारी (ता. २५) पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी बिबट्या आढळून आला. वन विभागाच्या वतीने पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्याचे काम सुरू असले तरीही विमानतळ प्रशासनानेदेखील आता सतर्क झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लॅडरचा वापर बंद केला आहे, मात्र एटीआर ७२ सारख्या छोट्या विमानाच्या वाहतुकीच्या वेळी ‘लॅडरचा’वावर करावा लागतो, मात्र याचे प्रमाण खूप कमी आहे. शिवाय लॅडरच्या वापरावेळी सुरक्षारक्षक व ऍप्रन सुरक्षा पथकाचे सदस्य प्रवाशांच्या संरक्षणासाठी तैनात केलेले आहेत.

विमानतळ प्रशासनाकडून उपाय
- अंधाऱ्या जागेत काही प्रमाणात प्रकाशाची व्यवस्था
- ग्राउंड स्टाफ यांना सतर्क राहण्याच्या सूचना
- कर्मचाऱ्यांनी एकटे ऍप्रन, ‘टॅक्सी वे’वर न जाण्याच्या सूचना
- खाली बसून काम करू नये, आवश्यक असल्यास ‘सीआयएसएफ’ जवानांच्या उपस्थितीत काम करावे.

वन विभागाकडून उपाय
- वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी दोन पिंजरे
- आतापर्यंत पाच ट्रॅप कॅमेरे लावले
- दररोज सायंकाळी व रात्री परिसराची पाहणी

बिबट्या आढळून आल्याने विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते उपाय योजिले आहेत. यात प्रामुख्याने शिडीची सेवा बंद केली असून, ऍप्रन सुरक्षा पथकाची गस्त वाढविण्यात आली आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना देखील आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

दृष्टिक्षेपात
- विमानांचे उड्डाण (दैनंदिन सुमारे ) : १००
- विमानाचे लँडिंग (दैनंदिन सुमारे ) : १००
- दररोज विमान वाहतूक (दैनंदिन सुमारे) : २००
- प्रवासी संख्या : सुमारे ३५ हजार
- एरोब्रिज : १०
- शहरांना कनेक्टिव्हिटी : ३९

म्हणजे काय?
१) लॅडर ः विमानात जाण्यासाठी किंवा उतरण्यासाठी शिडी
२) ऍप्रन ः जिथे विमाने उभी असतात. प्रवाशांचे सामान, माल याच ठिकाणी विमानातून काढले व भरले जाते
३) टॅक्सीवे : ऍप्रन आणि धावपट्टीला जोडणारा रस्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com