पुणे मेट्रोच्या विस्ताराला मंजुरी विस्तार प्रकल्पाला केंद्राची मंजुरी, बदलापूर-कर्जत दोन रेल्वे मार्गांना हिरवी झेंडा
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २६ : पुणे मेट्रो रेल्वेच्या जाळ्यात आणखी ३२ किलोमीटरची भर घालणाऱ्या खराडी ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग अशा दोन मेट्रो रेल्वे मार्गांच्या नऊ हजार ८५८ कोटी रुपयांच्या विस्ताराच्या प्रस्तावाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर पश्चिम भारताला दक्षिण भारताशी जोडण्यात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बदलापूर-कर्जतदरम्यानच्या एक हजार ३२४ कोटींच्या प्रत्येकी ३२ किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
मेट्रो विस्ताराला मिळालेल्या आजच्या मंजुरीमुळे खडकवासला, कोथरूड, वारजे, माणिकबाग, राजाराम पूल या दाट लोकसंख्येच्या भागांमध्ये मेट्रोची सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे पुढची अनेक दशके पुणे शहराच्या विकासाला बळ मिळत राहील, असा विश्वास केंद्रीय माहिती व नभोवाणीमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. देशातील अव्वल दहा शहरांमध्ये आणि सर्वांत मोठ्या शहरांमध्ये समावेश असलेल्या व ८० लाखांहून अधिक लोकसंख्येसह महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर असलेल्या पुणे शहराच्या मेट्रो रेल्वे जाळ्याचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये यापूर्वी घेण्यात आला आहे.
पुण्यातील उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम मेट्रो रेल्वे मार्गिका सप्टेंबर २०२४ पासून कार्यान्वित झाल्या असून, दररोज अडीच लाख प्रवासी त्यांचा वापर करतात. यंदा गणेशोत्सवादरम्यान या दोन्ही मार्गांवर सुमारे पाच लाख ९० हजार प्रवाशांनी प्रवास करत उच्चांक गाठला आहे. आज मंजुरी दिलेल्या विस्तार प्रकल्पांमुळे पुणे मेट्रो रेल्वेचे जाळे १०० किलोमीटरचा टप्पा पार करणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन करणार आहे. देशात आतापर्यंत २० हून अधिक शहरांमधील मेट्रो रेल्वेचे जाळे एक हजार ८३ किलोमीटरवर पोहोचले असून भारत हा मेट्रोचे जगातील दुसरे सर्वाधिक मोठे जाळे असलेला देश बनला आहे.
पुणे मेट्रोच्या मंजुरी मिळालेल्या दोन मार्गिका
- लाइन : खराडी ते खडकवासला
- लांबी : २५.५ कि.मी.
- स्थानके : २२
------------------------------------
- लाइन (अ) : नळ स्टॉप ते माणिकबाग
- लांबी : ६.१ किमी
- स्थानके : ६
-----------------------------------
९ हजार ८५८ कोटी रुपये
- गुंतवणूक
३१.६४ कि.मी.
- एकूण लांबी
२८
- स्थानके
५ वर्षे
- प्रकल्प कालावधी
पुणे मेट्रोच्या प्रगतिपथावरील मार्गिका
- माण- हिंजवडी ते शिवाजीनगर
- लांबी : २३.२ किलोमीटर
- खर्च : ८ हजार ३१३ कोटी रुपये
---------------------------------
- निगडी ते पिंपरी-चिंचवड महापालिका
- लांबी : ४.४ कि.मी.
- खर्च : ९१० कोटी रुपये
----------------------------------
- स्वारगेट ते कात्रज
- लांबी : ५.५ कि.मी.
- खर्च : २ हजार ९५४ कोटी रुपये
-------------------------------------
- वनाज ते चांदणी चौक
- लांबी : १२.८ कि.मी.
- खर्च : ३ हजार ६२६ कोटी रुपये
---------------------------------
बदलापूर-कर्जत रेल्वे मार्ग
पश्चिम भारताला दक्षिणेशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या कल्याणपासून कर्जतदरम्यान बदलापूरपर्यंत चार रेल्वे मार्गांचे काम सुरू आहे. मुंबईपासून हैदराबाद, चेन्नई आणि बंगळूर या तिन्ही मार्गांचे आज मंजुरी दिलेल्या प्रकल्पामुळे क्षमतावर्धन होणार आहे. या प्रकल्पाचा ५० टक्के खर्च राज्य सरकार देणार आहे. या प्रकल्पासाठीचे बहुतांश भूसंपादन पूर्ण झाल्यामुळे अतिशय वेगाने हा प्रकल्प पूर्णत्वाला जाईल, असे रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले. या रेल्वे मार्गांवर आठ प्रमुख आणि १०६ लहान पूल असल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी आणि कल्याण भागातील मालवाहतुकीला मोठा हातभार लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

