मतदार यादी दुरुस्तीसाठी माजी नगरसेवकांनी गर्दी
पुणे, ता. २६ ः मतदार याद्या तपासण्यासंदर्भातचे आदेश निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिल्यानंतर बुधवारी दिवसभर माजी नगरसेवकांनी आयुक्तांकडे रांग लावली. दुबार नावे, दुसऱ्याच प्रभागांमध्ये नावे जाण्यापासून ते ग्रामीण भागातील नावे शहराच्या मतदार यादीमध्ये आल्याच्या तक्रारी माननीयांनी आयुक्तांकडे केल्या. मतदार यादीमध्ये तातडीने दुरुस्ती करून निर्दोष मतदार यादी तयार करण्याची मागणी माजी नगरसेवकांनी केली.
महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी नुकतीच जाहीर केली. यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच विविध राजकीय पक्ष, प्रमुख पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून यादी तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी मतदार यादीमध्ये दुबार नावे, प्रभागांच्या हद्दीवरील मतदारांची नावे इतर प्रभागांमध्ये जाणे, हजारो मतदारांची नावे एका प्रभागामधून हद्दीजवळच्याच नव्हे, तर थेट दूरच्या प्रभागामध्ये जाणे, ग्रामीण भागातील मतदारांची नावे या मतदारयादीमध्ये समाविष्ट असणे, एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जाणे या स्वरूपाचा मोठा गोंधळ मतदार यादीमध्ये झाल्याचे उघडकीस आले होते. त्यावरून राजकीय पक्ष, इच्छुक व कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाकडे संताप व्यक्त करतानाच राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारींचा पाऊस पाडला. महापालिकेकडे तब्बल पाचशेहून अधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या. महापालिका प्रशासनाने प्रारंभी ही तांत्रिक चूक असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीतील गोंधळ दूर करण्याचे काम महापालिका आयुक्तांनी स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण करावे, संबंधित मतदार याद्या तपासून घ्याव्यात, असे आदेश महापालिका प्रशासनास दिले. त्यानंतर, बुधवारी सकाळपासूनच माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रारी नोंदविण्यास सुरुवात केली. माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी नगरसेवक यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी महापालिका आयुक्तांना मतदार यादीतील त्रुटी निदर्शनास आणून देत त्यांच्याशी चर्चा केली. त्रुटी दूर करून मतदार यादी निर्दोष करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

