‘एमएसएमई हेल्पलाइन’ला उदंड प्रतिसाद

‘एमएसएमई हेल्पलाइन’ला उदंड प्रतिसाद

Published on

पुणे, ता. २८ : राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) भेडसावणाऱ्या अडचणींवर त्वरित आणि प्रभावी उपाय मिळावा, तसेच नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सहजपणे मिळावा, यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’तर्फे (एमसीसीआयए) सुरू करण्यात आलेले ‘एमएसएमई हेल्पलाइन’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता स्टुडीओ’ हे उपक्रम देशातील उद्योजकांसाठी ‘संजीवनी’ ठरत आहेत. राज्यासह देशभरातून या हेल्पलाइनला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आत्तापर्यंत ३ हजारहून अधिक व्यापारी आणि उद्योजकांनी याचा लाभ घेतला आहे, अशी माहिती ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबणे यांनी दिली.

गिरबणे म्हणाले, ‘‘राज्यात साधारण ११ कोटींहून अधिक एमएसएमई आहेत आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्याही मोठी आहे. व्यवसाय सुरू करताना अनेकांना सरकारच्या योजना, व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया किंवा आधुनिक व्यवस्थापन पद्धती यांची माहिती नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी लक्षात घेऊन, ‘एमसीसीआयए’ने सुरू केलेली ‘एमएसएमई हेल्पलाइन राज्यासह देशभरातील व्यापारी आणि उद्योजकांसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.’’
---------------
अशी काम करते हेल्पलाइन
या हेल्पलाइनमध्ये तीन स्तरांवर टीम काम करते. यामध्ये प्रथम स्तरावर अडचण असलेला व्यापारी किंवा उद्योजक. दुसऱ्या स्तरावर एमएसएमई हेल्पलाइन टीम आणि तिसऱ्या स्तरावर तज्ज्ञ यांचा समावेश आहे. एखादा उद्योग सुरू करताना येणाऱ्या अडचणींपासून ते सुरू असलेल्या उद्योगात प्रगतीसाठी काय करावे, या सर्व प्रश्नांवर येथे मोफत आणि सखोल मार्गदर्शन केले जाते, तसेच ‘एमएसएमई हेल्पलाइन’चा लाभ घेण्यासाठी ‘एमसीसीआयए’चे सभासद असण्याची गरज नाही. ही सेवा सर्वांसाठी पूर्णतः निःशुल्क आहे.
-------------
३० टक्के महिलांचे प्रमाण
आत्तापर्यंत राज्यातील ३५ जिल्ह्यांतील तीन हजारांहून अधिक उद्योजकांनी या सेवांचा लाभ घेतला आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातूनही उद्योजकांनी सहभाग नोंदवला आहे. यामधील २० ते २५ टक्के नवउद्योजक असून ४०० हून अधिक महिलांनी हेल्पलाइनचा वापर केला आहे, जे एकूण प्रतिसादाच्या सुमारे ३० टक्के आहे, असेही गिरबणे यांनी नमुद केले.
-----------------
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) स्टुडीओ
बदलत्या तंत्रज्ञानासोबत जुळवून घेण्यासाठी, ‘एमसीसीआयए’ने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता स्टुडीओ’देखील सुरू केला आहे. ‘एमएसएमई’मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अडचणी सोडवण्यासाठी हा स्टुडीओ उपयुक्त ठरत आहे. नवीन तंत्रज्ञानाचे योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हा स्टुडीओ तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत ३५० हून अधिक नागरिकांनी या स्टुडिओचा लाभ घेतला असल्याची माहिती गिरबणे यांनी दिली.
-------------------
या विषयांवर मोफत मार्गदर्शन
- व्यवसाय नोंदणी
- जीएसटीविषयक सल्ला
- वित्तीय मार्गदर्शन
- जीईएमविषयक प्रशिक्षण
- मार्केटिंग आणि ब्रँडिंग
- आयात-निर्यात मार्गदर्शन
- शासकीय योजनांची माहिती
- प्रकल्प प्रस्ताव तयार करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com