स्पर्धा मार्गावरील जाहिरात फलक हटविण्याचे आदेश
पुणे, ता. २८ : ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकलिंग स्पर्धेच्या रस्त्यांवर मार्गदर्शक फलक, पर्यटन स्थळांच्या फलकांसह (सायनेजेस) स्पर्धेला अडथळा ठरतील असे जाहिरात फलक (होर्डिंग्ज) तातडीने काढावेत, तसेच सर्व यंत्रणांनी स्पर्धा संपेपर्यंत रस्त्याची नियमित तपासणी करावी,’’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी दिल्या.
‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकलिंग’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता आर. एस. रहाणे, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव, पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखा पोलिस उपायुक्त विवेक पाटील, पुणे ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक दिलीप शिंदे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. प्रशांत वडेकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठीच्या रस्त्यांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा यावेळी डॉ. पुलकुंडवार यांनी घेतला. ते म्हणाले, ‘‘सार्वजनिक बांधकाम विभाग, दोन्ही महापालिका तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सीएफआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रस्त्यांचे काम करावे. दरवर्षी स्पर्धा होणार असल्याने होणारे रस्ते अत्यंत टिकाऊ व्हावेत, गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होता कामा नये, पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, योग्य ते मार्गदर्शक फलक, पर्यटन स्थळांचे फलक करण्यासह स्पर्धेला अडथळा ठरतील असे जाहिरात फलक (होर्डिंग्ज) तातडीने काढावेत. सर्व यंत्रणांनी स्पर्धा संपेपर्यंत रस्त्याची नियमित तपासणी करावी.’’
या वेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पर्धेचे क्रीडा वाहिनीवरून थेट प्रक्षेपण होणार असल्याचे सांगितले. यंत्रणांना आवश्यक ते साधनसामग्रीसाठी निधी पुरविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनीही मार्गावर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पोलिस विभागाकडून स्पर्धा मार्गावर करावयाचे बॅरिकेडिंग, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक वळविणे आदींविषयी माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

