विद्यापीठात सागरी अभ्यासाला मिळणार चालना नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांची घोषणा
पुणे, ता. १ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समृद्ध वारशात आता लवकरच ‘सागरी अभ्यास आणि संशोधना’च्यानिमित्ताने आणखी एक मानाचा शिरपेच रोवला जाणार आहे. भारतीय नौदलाच्या सहकार्याने विद्यापीठात लवकरच ‘चेअर ऑफ एक्सलन्स ऑन मेरीटाईम स्टडीज्’ सुरू होण्याची चिन्हे आहेत. याद्वारे, सागरी अभ्यासक्रम सुरू होऊन संशोधनाला चालना मिळेल. भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी याला दुजोरा दिला आहे.
विद्यापीठात ‘जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यान’ सोमवारी आयोजित करण्यात आले. यावेळी त्रिपाठी यांनी ही माहिती दिली.
त्रिपाठी म्हणाले,‘‘जवळपास ५० हून अधिक शैक्षणिक विभाग, ३००हून अधिक मान्यताप्राप्त संशोधन संस्था आणि ६००हून अधिक संलग्न महाविद्यालये आणि अभिमानास्पद वारसा असणारे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे. भारतीय नौदलाकडे विद्यापीठाकडून विनंती प्रस्ताव आले आहेत. परंतु, विद्यापीठात ‘चेअर ऑफ एक्सलन्स ऑन मेरीटाईम स्टडीज्’ सुरू करण्याची विनंती मी करत आहे.’’
त्रिपाठी म्हणाले,‘‘पुण्यासह महाराष्ट्रात सागरी अभ्यासक आणि तज्ज्ञ आहेत. सागरी अभ्यासातील तज्ज्ञांच्या साहाय्याने विद्यापीठात हा अभ्यासक्रम राबविण्यात यावा.’’
‘‘विद्यापीठात ‘चेअर ऑफ एक्सलन्स ऑन मेरीटाईम स्टडीज्’ याद्वारे सागरी अभ्यास आणि संशोधनाला चालना मिळणार आहे. भारतीय नौदल प्रमुखांनीच विद्यापीठात ‘चेअर ऑफ एक्सलन्स’ सुरू करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे, नव्या वर्षात (दोन ते तीन महिन्यात) ‘चेअर ऑफ एक्सलन्स ऑन मेरीटाईम स्टडीज्’ सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील,’’ अशी माहिती विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी ‘सकाळ’ला दिली.
.........
विद्यापीठात लवकरच सेवानिवृत्त ‘मिग-२१’
‘‘विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाने भारतीय सैन्य दल, हवाई दल आणि नौदलाचे कायमच सहकार्य लाभले आहे. सैन्य दलाने विद्यापीठाला रणगाडा भेट दिला आहे. तर, भारतीय हवाई दलाने सेवानिवृत्त ‘मिग-२१’ विद्यापीठाला देण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भातील सर्व अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच विद्यापीठात सेवानिवृत्त ‘मिग-२१’ हे लढाई विमान येणार आहे. भारतीय लष्कराशी संलग्न विविध अभ्यासक्रम राबविणाऱ्या काही मोजक्या संस्थांपैकी हे एक विद्यापीठ आहे. त्यामुळे आता भारतीय नौदलाने देखील पुढाकार घ्यावा.’’ अशी विनंती विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

