भूमिगत मेट्रो मार्गाची निविदा अखेर मंजूर स्वारगेट- कात्रज मार्ग ः तीन महिन्यांत कामाला सुरवात होणार
पुणे, ता. १ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केल्यानंतर तब्बल १४ महिन्यांनी स्वारगेट- कात्रज भूमिगत मेट्रो मार्गासाठी प्रशासकीय पाऊल पुढे पडले आहे. अदानी समूहाच्या ‘आयटीडी सिमेंटेशन’ कंपनीला भूमिगत मेट्रोचे काम मिळाले आहे. आता तीन महिन्यांत कामाला प्रारंभ होईल.
या भूमिगत मेट्रो मार्गाचे भूमिपूजन गेल्यावर्षी २९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु, या मार्गावर बिबवेवाडी (स्वामी विवेकानंद पुतळा) आणि बालाजीनगर ही दोन स्थानके समाविष्ट करण्याची मागणी नागरिकांनी केली. त्यासाठी आंदोलनेही झाली होती. राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली. त्यानंतर केंद्र सरकारची मंजुरी घेऊन दोन स्थानकांचा मूळ आराखड्यात समावेश करण्यात आला. त्यामुळे या भूमिगत मेट्रो मार्गाच्या कामास काहीसा विलंब झाला.
स्वारगेट- कात्रज या ५. ४६ किलोमीटरच्या भूमिगत मार्गासाठी महामेट्रोने निविदा मागविल्या होत्या. त्यात ५ कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यात ‘आयटीडी सिमेंटेशन’ या कंपनीच्या निविदा स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत सुमारे २६ टक्क्यांनी कमी आल्या. त्यामुळे तांत्रिक छाननीनंतर या कंपनीला महामेट्रोने मेट्रोचे काम नुकतेच सोपविले. पहिल्या टप्प्यात मार्केटयार्ड, पद्मावती आणि कात्रज या स्थानकादरम्यानच्या भूमिगत मार्गांचे काम होईल. त्यासाठी १ हजार ३६४ कोटी ५९ लाख रुपये खर्च येणार आहे.
----
- स्वारगेट - कात्रज मार्गासाठी एकूण सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपये खर्च होणार आहे
- स्वारगेट - कात्रज मार्गावर मार्केटयार्ड, बिबवेवाडी (विवेकानंद पुतळा), बालाजीनगर (धनकवडी), भारती विद्यापीठ आणि कात्रज ही स्थानके असतील
- जमिनीपासून १२ ते २८ मीटर खोलवर भूमिगत मेट्रोचे काम होईल
- मार्चच्या पहिल्या आठवड्यात ‘टनेल बोअरींग मशिन (टीबीएम) द्वारे काम सुरू होईल
- एकूण ४२ महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे
- -----------
‘‘स्वारगेट- कात्रज भूमिगत मार्गासाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. या मार्गाचे काम सुरू करण्यासाठी निवडणुकीचा अडसर येणार नाही. संबंधित कंपनीबरोबर येत्या २८ दिवसांत कामाबाबत करार होईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यात काम सुरू होईल. त्यासाठीची पूर्वतयारी आता सुरू झाली आहे. या मार्गामुळे दक्षिण पुण्यातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.’’
- चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो, पुणे.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

