दोन वाहनतळांचे ठेके रद्द करण्याचा प्रस्ताव एकावर दंडात्मक कारवाई ः सर्वाधिक तक्रारी असणाऱ्या वाहनतळाला मात्र अभय
पुणे, ता. १ ः महापालिकेच्या वाहनतळांवर होणाऱ्या लुटीबाबत ‘सकाळ’ने वृत्तमालिकेद्वारे प्रकाश टाकल्यानंतर दोन वाहनतळांचे ठेके रद्द करण्याचा, त्यांची अनामत रक्कम जप्त करण्याचा तसेच एका वाहनतळावर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. मात्र, नागरिकांची सर्रासपणे लूट करणे, शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करणे अशा सर्वाधिक तक्रारी असणाऱ्या कै. सतीशशेठ धोंडीबा मिसाळ वाहनतळाच्या ठेकेदारावर मात्र कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
महापालिकेचा महात्मा फुले मंडई येथील कै. सतीश धोंडिबा मिसाळ वाहनतळ, हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ (आर्यन पार्किंग), नारायण पेठेतील शिवाजीराव आढाव वाहनतळ, हरिभाऊ साने वाहनतळ, पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ अशा विविध वाहनतळांवर महापालिकेने निश्चित केलेल्या दरांपेक्षा नागरिकांकडून जादा शुल्क आकारणी करणे, नागरिकांशी हुज्जत घालणे, दमदाटी, शिवीगाळ, मारहाण करणे, नागरिकांऐवजी व्यावसायिकांसाठी पार्किंग राखीव ठेवणे, पार्किंगच्या जागेत स्वतःची कार्यालये, दुकाने थाटणे, जागा भाड्याने देणे यांसारखे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. त्यावर नागरिकांना वाहनतळांवर येणारे वाईट अनुभव व प्रत्यक्षात पाहणी करून ‘सकाळ’ने ‘आर्थिक लुटीचा तळ’ या वृत्तमालिकेद्वारे वाचा फोडली होती. त्यावर पुणेकरांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आपल्या तक्रारी, प्रतिक्रिया नोंदवून कारवाईची मागणी केली होती.
दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठवला. वाहनतळांवर वाहनचालकांना दिसतील अशा स्वरूपातील माहिती फलक, नियम, पार्किंगचे दर, पावती देण्यासंबंधी आणि तक्रारींसाठी ईमेल, अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक यासंबंधीचे फलक लावण्याचे काम केले. दरम्यान, महापालिकेने महात्मा फुले मंडई येथील हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ (आर्यन पार्किंग) व नारायण पेठ येथील शिवाजीराव आढाव वाहनतळाचा ठेका रद्द करण्याचा, ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळाच्या ठेकेदारावर तीन हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्तावही अद्याप मंजूर झालेला नाही.
सर्वाधिक तक्रारी कै. सतीशशेठ धोंडिबा मिसाळ वाहनतळासंबंधी आहेत. तेथील गुंडप्रवृत्तीला अनेक नागरिकांना सामोरे जावे लागले आहे. मात्र, तरीही त्या ठेकेदारावर कुठलीही कारवाई झालेली नाही. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आदेश देऊनही केवळ राजकीय वरदहस्त असल्यामुळे ठेकेदारावर कारवाईचे धाडस दाखवले जात नाही, अशी चर्चा नागरिकांत आहे.
------------------
‘‘नागरिकांकडून जादा शुल्क आकारणी करणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ व शिवाजीराव आढाव वाहनतळाच्या ठेकेदारांचे ठेके रद्द करणे, त्यांची अनामत रक्कम जप्त करण्याचा, तसेच पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव तयार आहे. त्यास मंजुरी मिळणे बाकी आहे.
- दिनकर गोजारे, प्रमुख, विशेष प्रकल्प विभाग, महापालिका.
----------------------
आर्थिक लुटीचे तळ - वृत्तमालिकेच्या बातम्यांचे कात्रणे वापरावीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

