कारागृहातील मुक्ततेनंतर दोघेही ‘प्रेरणापथा’वर लेखन व चित्रकलेच्या प्रदर्शनाला प्रतिसाद
पुणे, ता. २ : तरुण वयात रागाच्या भरात झालेल्या चुकीमुळे कारागृहात गेलेल्या दोन युवकांनी कारागृहातील नकारात्मक वातावरणातही चित्रकला आणि लेखनाची कला जोपासली. कारागृह प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या कॅनव्हास, रंग आणि ब्रश यांच्या मदतीने त्यांनी शिक्षा भोगण्याचा काळ सर्जनशीलतेत बदलला. बाहेर आल्यानंतर हीच कला त्यांच्या नव्या आयुष्याचा आधार ठरली.
अनिल आणि सुनील (नावे बदलली आहेत) या दोघांची मैत्री कारागृहातच झाली. अनिल चित्र काढतो आणि सुनील त्या चित्रांवर लेखन करतो. त्यांच्या या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्यावतीने आणि महाराष्ट्र कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘प्रेरणापथ’ या प्रकल्पाचा उपयोग झाला. मुक्त झाल्यानंतर कैद्यांना रोजगार मिळावा आणि ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नयेत, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. आतापर्यंत ४२ मुक्त बांधवांनी याचा लाभ घेतला आहे.
या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून या दोघांच्या कलेचे प्रदर्शन स्व. बाळासाहेब ठाकरे कला दालनात आयोजित करण्यात आले. बाल गुन्हेगारी, स्त्री–पुरुष समानता, अंधश्रद्धा, पर्यावरण, सामाजिक मूल्ये अशा विविध विषयांवर आधारित चित्रांनी प्रेक्षकांना विचार करायला लावले. या कलाप्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय राज्य मंत्री माधुरी मिसाळ, महाराष्ट्र कारागृह प्रशासन अपर पोलिस महासंचालक सुहास वारके, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, विशेष पोलिस महानिरीक्षक सीआयडी सुधीर हिरेमठ, विशेष कारागृह निरीक्षक योगेश देसाई, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंजाड, येरवडा कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ, येरवडा खुले कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे, ज्येष्ठ विधीज्ञ प्रताप परदेशी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी स्पष्ट केली.
फोटो ः 73045
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

