मनोरंजनात्मक कार्यक्रमांना साहित्याचे अधिष्ठान साताऱ्यातील संमेलनात ‘शिकायला गेलो एक’ नाटक आणि ‘फोक आख्याना’ची पर्वणी
महिमा ठोंबरे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २ ः सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मनोरंजनात्मक कार्यक्रमांना यंदा साहित्याचे अधिष्ठान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोककलेवर आधारित ‘द फोक आख्यान’, द. मा. मिरासदार यांच्या कथेवर आधारित ‘शिकायला गेलो एक’ नाटक अशा कार्यक्रमांचा यंदा संमेलनात समावेश असून, तरुणाईची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
साहित्य संमेलनांमध्ये होणाऱ्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांची दरवेळी चर्चा होत असते. साहित्यविषयक कार्यक्रमांपेक्षा मनोरंजनात्मक कार्यक्रमांवरच अधिकचा खर्च, त्याला होणारी गर्दी, कलाकारांची होणारी ‘व्हीआयपी’ व्यवस्था, यावरून टीका केली जाते. काही गावांमध्ये संमेलनापेक्षा या कार्यक्रमांचीच अधिक चर्चा होते. हे टाळण्यासाठी यंदा साहित्याशी संबंधित कार्यक्रमांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
साताऱ्यात १ ते ४ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या संमेलनात विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर होतील. यात सध्या अतिशय लोकप्रिय असलेल्या ‘द फोक आख्यान’ या कार्यक्रमाचा समावेश आहे. विस्मरणात गेलेली लोककला आणि लोकसाहित्य यांना नव्या ढंगात सादर करणाऱ्या या कार्यक्रमातील सर्व कलाकार तरुण आहेत. सातारकरांना संमेलनाच्या निमित्ताने हा लोकप्रिय कार्यक्रम अनुभवता येणार आहे.
लोककलेचे युवा अभ्यासक भावार्थ देखणे यांचा ‘बहुरूपी भारूड’ हा कार्यक्रमही संमेलनात सादर होणार आहे. संतसाहित्यावर आधारित या कार्यक्रमातून भारूड या प्रकाराची सफर घडते. यासह द. मा. मिरासदार यांच्या ‘व्यंकूची शिकवणी’ या कथेवर आधारित ‘शिकायला गेलो एक’ या नाटकाचा प्रयोगही संमेलनात सादर होणार आहे. अद्वैत दादरकर लिखित-दिग्दर्शित या नाटकात प्रशांत दामले यांची प्रमुख भूमिका आहे. या नाटकाच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर संमेलनाच्या मांडवात नाटकाचा प्रयोग रंगणार आहे.
----
‘‘साहित्य संमेलन हा भाषेचा उत्सव आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या रसिकांचा विचार करून संमेलनातील कार्यक्रमांची आखणी करायला हवी. काही रसिकांना तात्त्विक चर्चांपेक्षा मनोरंजनातून गोष्टी समजून घ्यायला अधिक आवडते. त्यामुळे मनोरंजनात्मक कार्यक्रमही सवंग लोकप्रियतेपेक्षा बोधप्रद आणि साहित्याशी संबंधित असावेत, असा आम्ही प्रयत्न केला आहे.
ः-प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

