वाढत्या थंडीमुळे शाळांच्या वेळेत बदल
शहरातील अनेक शाळांचा निर्णय ः लहान मुलांसह पालकांना दिलासा

वाढत्या थंडीमुळे शाळांच्या वेळेत बदल शहरातील अनेक शाळांचा निर्णय ः लहान मुलांसह पालकांना दिलासा

Published on

पुणे, ता. ३ :
शहरात काही दिवसांपासून थंडीचा कडाका जाणवत आहे. विशेषत: सकाळी किमान तापमानात लक्षणीय घट होत असल्याचे दिसून येते. परिणामी लहान मुलांना थंडीचा कडाका सोसत शाळेत जावे लागते. म्हणून आता शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेत बदल केला आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी-अधिक किमान तापमानाची नोंद होत आहे. परिणामी सकाळी हूडहुडी भरविणारी थंडी जाणवत आहे. सकाळच्या वेळेत जाणवणाऱ्या थंडीमुळे विद्यार्थी गारठून जात आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळेतील बदल केला आहे. मध्यवर्ती भागातील काही शाळांनी नियोजित वेळापत्रकात बदल केला आहे. त्यामुळे आता शाळा नियोजित वेळेपासून २० ते ४० मिनिटे उशिराने भरत आहेत. तर, काही शाळा अद्यापही वेळापत्रकात आवश्यक तो बदल करण्याच्या प्रक्रियेत आहेत.
‘अत्यंत थंडीत लहान मुलांना सकाळी उठवणे आणि शाळेत पाठवणे कठीण होत होते. शाळांनी वेळ बदलल्याने मोठा दिलासा मिळाला’, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्य संरक्षणासाठी हे योग्य पाऊल असल्याचे सर्वसाधारण मत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस सकाळच्या वेळेत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. परिस्थिती आणखी बदलल्यास शाळांच्या वेळेत पुन्हा सुधारणा करण्याबाबत प्रशासन सज्ज असल्याचे शाळांकडून सांगण्यात आले.

‘‘शहरात वाढलेल्या थंडीच्या वातावरणामुळे लहान मुलांना सकाळी शाळेत येताना त्रास होऊ नये, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत आम्ही शाळेच्या वेळेत थोडासा बदल करण्याचे नियोजन केले आहे. पालकांचीही या बदलाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली असून, सर्वांच्या सहकार्याने हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपयुक्त ठरेल.’’
- प्रीतम जोशी, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, शनिवार पेठ
.................
‘‘सध्या सकाळच्या वेळेत थंडीचा कडाका वाढला असून, लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. याच काळात शाळेत स्नेहसंमेलन आणि विविध खेळांच्या स्पर्धा सुरू असल्याने विद्यार्थी कोणत्याही उपक्रमापासून वंचित राहू नयेत आणि त्यांची तब्येतही बिघडू नये, यासाठी शाळेच्या वेळेत किरकोळ बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.’’
- प्रसाद लागू, मुख्याध्यापक, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय

‘‘सकाळची थंडी दिवसेंदिवस वाढत असल्याने लहान मुलांना शाळेत येताना अडचणी निर्माण येतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळा उशिरा भरविण्याचा जो निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे, तो योग्य आणि स्वागतार्ह आहे. थंडीच्या तीव्रतेत मुलांची तब्येत बिघडू नये हीच आमची इच्छा आहे.
- जयश्री शेळके, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com