वाहतूक सुधारणांची कामे कागदावर

वाहतूक सुधारणांची कामे कागदावर

Published on

पुणे, ता. ७ : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध विभागांच्या मदतीने ३२ प्रमुख रस्ते आणि ४० चौकांमध्ये सुधारणा सुरु केल्या आहेत. यामध्ये अनधिकृत पार्किंग आणि बेकायदा बांधकाम, अतिक्रमणांच्या अडथळ्यांमुळे वाहतूक गतिमान करण्यास अपयश येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या सुधारणांसाठी वारंवार पाठपुरावा, बैठका, प्रत्यक्ष जागा पाहणी केली जात असली तरी कामाला गती आलेली नाही. आतापर्यंत ज्या काही सुधारणा झाल्या आहेत, त्यातून वाहनांचा वेग सरासरी १५ ते २० टक्के इतका वाढला आहे.

पुणे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे. १० किलोमीटर अंतर जाण्यासाठी ३३ मिनिटांचा वेळ लागत आहे. वाहतूक कोंडीत पुण्याचा जगात चौथा क्रमांक लागत आहे. वाहतूक कोंडीचा पुणेकरांच्या जीवनमानावर वाईट परिणाम होत आहे. खराब रस्ते, अतिक्रमण, अवैध बांधकामांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यावर जुजबी कारवाई केल्यानंतर पुन्हा अतिक्रमणे थाटली जात असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटू शकलेला नाही.
पुण्यात जानेवारी महिन्यात जागतिक स्तरावरील सायकल स्पर्धा होणार आहे. हा सायकल मार्ग शहराच्या विविध भागांतून जात असताना त्यांचे डांबरीकरण व सुशोभीकरण करण्यावर सुमारे १४५ कोटी रुपये खर्च केला जात आहेत. असे असताना शहरातील प्रमुख ३२ रस्ते आणि २२ चौक या ठिकाणी वाहतूक कोंडी का होते? याची कारणे शोधण्याचे आदेश आयुक्त नवलकिशोर राम यांनी बैठकीत दिले होते. यामध्ये पथ विभाग, बांधकाम विभाग, क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळ कार्यालय, अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग, आकाश चिन्ह या विभागांमधील अधिकारी, अभियंत्यांनी एकत्रित अहवाल तयार केला आहे. त्यावर महापालिकेचे विविध विभाग, वाहतूक पोलिस, महावितरण, आरटीओ, पीएमआरडीए, पीएमपी हे सर्व विभाग एकत्रित काम करत आहेत.


३२ रस्त्यांवर ८० टक्के वाहतूक
पुणे शहरातील वाहनांची संख्या सुमारे ३४५ लाख इतकी आहे. त्यापैकी ८० टक्के वाहने हे शहरातील प्रमुख ३२ रस्त्यांचा वापर करतात. या रस्त्यांवर वाहतूक सुधारणा केल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शहरावर होणार आहे. त्यामुळे रस्त्यातील अतिक्रमण, विजेचे खांब, महावितरणचे फिडर, झाड, रिक्षा थांबे, पीएमपी बस थांबे काढल्यास, रस्ते चांगले केले तर वाहतूक गतिमान होऊ शकते. हे काम आतापर्यंत ४० टक्के झाले असून, त्यामुळे १५ ते २० टक्के वाहतुकीचा वेग वाढला आहे.


पार्किंग, अतिक्रमणांचा प्रश्‍न गंभीर
महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात या प्रमुख ३२ रस्त्यांवर ५९ ठिकाणी अनधिकृत पार्किंग आणि ५५ ठिकाणी अतिक्रमणे असल्याचे अहवालात नमूद केले. पार्किंगवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. तर अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली पाहिजे. पण आतापर्यंत ५९ पैकी केवळ तीन ठिकाणचे अनधिकृत पार्किंग बंद झाले असून २४ ठिकाणी काम सुरु आहे. तर ३२ ठिकाणी अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. याच पद्धतीने ३२ रस्त्यांवर ५५ ठिकाणी अतिक्रमणे असून, त्यापैकी १२ ठिकाणी कारवाई झाली आहे, २४ ठिकाणी काम सुरु आहे. तर १९ ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई केलेली नाही. हे दोन प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. तसेच कचरा, सिग्नल समस्येवरही तोडगा काढता आलेला नाही.


३२ रस्ते सुधारणा कामाची स्थिती
रस्ता डांबरीकरण
अपेक्षित काम -३२ ठिकाणी
झालेले काम - ७ ठिकाणी
सुरु असलेले काम - ४ ठिकाणी
प्रलंबित काम - २१

चेंबर दुरुस्ती
अपेक्षित काम -१४ ठिकाणी
झालेले काम - ३ ठिकाणी
सुरु असलेले काम - ० ठिकाणी
प्रलंबित काम -११ ठिकाणी

अनधिकृत पार्किंग
अपेक्षित काम - ५९ ठिकाणी
झालेले काम - ३ ठिकाणी
सुरु असलेले काम - २४ ठिकाणी
प्रलंबित काम - ३२ ठिकाणी

सिग्नल समस्या
अपेक्षित काम - ९ ठिकाणी
झालेले काम - ० ठिकाणी
सुरु असलेले काम - ३ ठिकाणी
प्रलंबित काम - ६ ठिकाणी

अतिक्रमण
अपेक्षित काम - ५५ ठिकाणी
झालेले काम - १२ ठिकाणी
सुरु असलेले काम - २४ ठिकाणी
प्रलंबित काम - १९ ठिकाणी

बॉटलनेक (अडथळा) दूर करणे
अपेक्षित काम - ५७ ठिकाणी
झालेले काम - १ ठिकाणी
सुरु असलेले काम - ५ ठिकाणी
प्रलंबित काम - ५१ ठिकाणी

रस्त्यातील झाडे काढणे
अपेक्षित काम - १४ ठिकाणी
झालेले काम - ० ठिकाणी
सुरु असलेले काम - ८ ठिकाणी
प्रलंबित काम - ६ ठिकाणी

विजेचे खांब काढणे
अपेक्षित काम - २० ठिकाणी
झालेले काम - ३ ठिकाणी
सुरु असलेले काम - ६ ठिकाणी
प्रलंबित काम - ११ ठिकाणी

कचरा टाकणे बंद करणे
अपेक्षित काम - ४ ठिकाणी
झालेले काम - ० ठिकाणी
सुरु असलेले काम - ० ठिकाणी
प्रलंबित काम - ४ ठिकाणी

पीएमपी बसथांबे स्थलांतर
अपेक्षित काम - २० ठिकाणी
झालेले काम - ० ठिकाणी
सुरु असलेले काम - ३ ठिकाणी
प्रलंबित काम - १७ ठिकाणी

रिक्षा थांबे स्थलांतर
अपेक्षित काम - २४ ठिकाणी
झालेले काम - १ ठिकाणी
सुरु असलेले काम - ११ ठिकाणी
प्रलंबित काम - १२ ठिकाणी

शहरातील ३२ रस्त्यांवरून जवळपास ८० टक्के वाहतूक होत आहे. त्यामुळे तेथे सुधारणा करणे गरजेचे आहे. प्रशासनाने अन्य विभागांशी समन्वय साधून काम केल्यास अतिशय कमी खर्चात ३० टक्क्यांपर्यंत वाहतूक सुधारू शकते. यासाठी आमचे एकत्रित प्रयत्न सुरु आहेत. जेथे कामाची गती कमी आहे, तेथे वाढविण्यात येईल.
- नवलकिशोर राम,
आयुक्त, महापालिका

(संकलन : अनिल सावळे, ब्रिजमोहन पाटील, अशोक गव्हाणे, जितेंद्र मैड, नीलेश कांकरिया, कृष्णकांत कोबल, शीतल बर्गे, महादेव पवार, जागृती कुलकर्णी, कैलास गावड, सचिन डोंगरे)

तुमचे मत मांडा...
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुधारणा सुरु केल्या आहेत. मात्र अनधिकृत पार्किंग, बेकायदा बांधकाम, अतिक्रमणांमुळे वाहतूक गतिमान करण्यास अपयश येत आहे. याबाबत तुमचे मत मांडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com