स्थायी समितीत ४०० कोटींची कामे मंजूर

स्थायी समितीत ४०० कोटींची कामे मंजूर

Published on

पुणे, ता. ५ ः महापालिका निवडणुकीची लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाकडून पटापट निविदा मंजूर करून घेण्याची धडपड सुरू झाली आहे. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे ४०० कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यामध्ये कचरा वाहतुकीसाठी पाच वर्षांसाठी ३४० घंटागाड्या घेतल्या जाणार असून, त्यासाठी तब्बल २८० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर होईल असे यापूर्वी सांगितले जात होते. त्यामुळे या निवडणुका या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतील असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, आता गेल्या चार-पाच दिवसांपासून नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेऐवजी महापालिकांच्या निवडणुका घेतल्या जाणार असल्याची चर्चा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहेच, पण त्याचे संकेतही प्रशासनाकडून दिले जात आहेत. पुण्यासह राज्‍यातील २९ महापालिकांची निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लागू शकते, असे सांगितले जात आहे.
आचारसंहिता लागण्याच्या धास्तीने महापालिकेतील विविध विभागांनी त्यांच्याकडील कामाच्या फाइल वेगात फिरविण्यास सुरुवात केली आहे. राजकीय कार्यकर्त्यांसह ठेकेदारांकडूनही फाईलचा पाठपुरावा सुरू झालेला आहे. शुक्रावारी महापालिकेची स्थायी समितीची बैठक आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांनी बैठक घेतली. यावेळी आयत्यावेळी सुमारे ५० प्रस्ताव दाखल करण्यात आले. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा विभाग, पथ विभाग, भवन रचना विभाग, उद्यान विभाग आदी विभागांतील कामांचा समावेश आहे. या विभागांचे सुमारे ४०० कोटींच्या कामांना आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

महत्त्वाचे
- महापालिकेकडून भाडे तत्त्वावर घंटागाड्या घेण्याचा निर्णय. ३४० घटांगाड्यांसाठी २८० कोटी रुपये मंजूर
- कात्रज सर्प उद्यानात सुधारणा करण्यासाठी ४८ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता
- शेवाळवाडी येथील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामला होणार सुरुवात. त्याच्या ३५ कोटींच्या निविदेला मंजुरी
- रस्ते दुरुस्ती, रस्ते रिसर्फेसिंग, रंगरंगोटी, चेंबर दुरुस्ती अशा देखभाल दुरुस्तीच्या सुमारे १० कोटींच्या कामाला मंजुरी
- झाडणकामाच्याही निविदा केल्या मंजूर

स्थायी समितीच्या बैठकीत कात्रज सर्प उद्यान, घंटागाड्या भाड्याने घेणे, पाणी पुरवठा, रस्त्याची विविध कामे यासह अन्य कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
- नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका

आणखी एक बैठक होण्याची शक्यता
महापालिका निवडणुकीचा आचारसंहिता १५ डिसेंबरनंतर कधीही लागू शकते. शुक्रवारी स्थायी समितीची बैठक झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेतील महत्त्वाच्या व मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून गडबड सुरू आहे. या गडबडीत चुकीचे प्रस्तावही मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com