संतसाहित्यातील ज्ञानामृताचा ‘अमृतानुभव’

संतसाहित्यातील ज्ञानामृताचा ‘अमृतानुभव’

Published on

पुणे, ता. ५ ः भगवंताचे नामस्मरण, भूतदया व परोपकार, इंद्रियनिग्रह, सत्संगाचे महत्त्व, समाधान व कृतज्ञता, निष्काम कर्मयोग अशी संतांनी दिलेली अनमोल शिकवण रसाळ निरुपणातून आणि सुरेल गाण्यांमधून उलगडली. कलाकारांच्या भावरसपूर्ण सादरीकरणातून जणू रसिकांनी संतसाहित्यातील ज्ञानामृताचा ‘अमृतानुभव’ घेतला.
निमित्त होते, ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ या महोत्सवाचे. या महोत्सवासाठी ‘सुहाना मसाले’ हे मुख्य प्रायोजक आहेत. विश्वकर्मा विद्यापीठ हे सहप्रायोजक असून भारती विद्यापीठ हे सहयोगी प्रायोजक आहेत. या महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी ‘अमृतानुभव’ या कार्यक्रमाने झाली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मोत्सवानिमित्त ही विशेष कलाकृती सादर करण्यात आली. 
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानाची रोजच्या अनुभवांशी सांगड घालत हा कार्यक्रम सादर झाला. ‘ॐ नमोजी आद्या’ या रचनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. ‘जय जय रामकृष्ण हरी’ अशा नामघोषाने वातावरण भक्तिमय झाले. ‘एक तत्त्व नाम दृढ धरीं मना’ या रचनेच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद देत ‘वन्स मोअर’ची मागणी केली. ‘दादला नको गं बाई’ या भारूडाने अधिकच रंगत आणली. ‘आनंदाचे डोही आनंदतरंग’, ‘अवघाचि संसार सुखाचा करीन’, ‘माझे माहेर पंढरी’ या गीतांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाली. उत्तरार्धाची सुरुवात ‘विंचू चावला’ या भारूडाने झाली. ‘खेळ मांडियेला’, ‘बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल’, ‘विठू माझा लेकुरवाळा’, ‘हरिभजनाविण काळ’, ‘सुनता है गुरू ग्यानी’, ‘अवघा रंग एक झाला’ अशा संतरचनांच्या सादरीकरणांमध्ये रसिक तल्लीन झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाची निर्मिती ‘इंडियन मॅजिक आय’ या संस्थेची आणि लेखन-दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले यांचे होते. ज्येष्ठ गायक रघुनंदन पणशीकर, ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, आनंदी जोशी आणि राहुल जोशी यांनी सर्व गीते सादर केली. अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी निरुपणात्मक निवेदन केले. सचिन इंगळे यांनी संगीत संयोजन व संवादनीवर साथसंगत केली. सर्व गायकांना व्हायोलिनवर रमाकांत परांजपे, बासरीवर नीलेश देशपांडे, की-बोर्डवर केदार परांजपे, तबल्यावर विक्रम भट, पखवाजवर प्रतीक गुजर आणि तालवाद्यांवर आदित्य आपटे यांनी साथसंगत केली.

रसाळ निवेदनाने भरले रंग
अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी आपल्या रसाळ निवेदनाने कार्यक्रमात रंग भरले. एकीकडे संतवचने, संतसाहित्यातील शिकवण उलगडताना त्याला दैनंदिन आयुष्यातील अनुभवांची जोड देत आणि निर्मळ विनोदांची पखरण करत त्यांनी रसिकांना खिळवून ठेवले. कऱ्हाडे यांनी सादर केलेल्या आईवरील कवितेला तर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com