विकसित राष्ट्रासाठी ‘सामाजिक स्वास्थ्य’ हवे सुदृढ
पुणे, ता. ७ : ‘‘भारताला विकसित राष्ट्र व्हायचे असेल, तर सर्वप्रथम ‘सामाजिक स्वास्थ्य’ सुदृढ केले पाहिजे. एखाद्या व्यक्तीचे सामाजिक, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडले, तर त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो; आणि समाज बिघडला तर देशही कमकुवत होतो,’’ असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद जी. खंदारे यांनी व्यक्त केले.
‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ महोत्सवातील तिसऱ्या दिवशी झालेल्या सत्रामध्ये ते बोलत होते. ‘संरक्षण दलातील शिस्त, आरोग्य आणि नेतृत्व’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. लेफ्टनंट जनरल खंदारे म्हणाले, ‘‘आपल्या देशाची लोकसंख्या १४० कोटी आहे. त्यातील ६० टक्के युवक आहेत. पण हा युवकवर्ग आरोग्यदायी नसेल, तर तो उर्वरित ४० टक्क्यांवर भार ठरतो. आपल्याकडे सामाजिक स्तरावर अनेक त्रुटी आहेत. त्या ओळखल्याशिवाय आणि स्वतःच्या चुका मान्य केल्याशिवाय बदल घडविणे अशक्य आहे. आपण सध्या माहिती युद्ध, सायबर युद्ध, बायोलॉजिकल युद्ध आणि अंतराळ युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. या नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी समाज म्हणून आपण तयार आहोत का, हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे.’’
सैन्य म्हणजे फक्त ‘स्नायूंची ताकद’ नाही...
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये लष्करी अधिकाऱ्यांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने केले जाते, याकडे लेफ्टनंट जनरल खंदारे यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘सैन्य म्हणजे फक्त स्नायूंची ताकद नाही. मन आणि शरीराचा समतोल साधणारे, दबावाखाली शांत राहणारे, निर्णयक्षम जवान हे भारतीय सैन्याचे खरे रूप आहे. अनेक तरुण फक्त शरीरसौष्ठवावर वेळ घालवतात, पण मानसिक शिस्तीकडे दुर्लक्ष करतात. गोळीबार, मृत्यूची सावली, अनिश्चितता यांच्यादरम्यान शांत राहणे ही खरी कसोटी असते.’’
लेफ्टनंट जनरल खंदारे म्हणाले...
- नेतृत्व म्हणजे आदेश नव्हे, जबाबदारी
- नेतृत्वपदी असलेल्या व्यक्तीला आदेशाची जबाबदारी घ्यावी लागते
- भीतीवर मात करणे, त्याग आणि दबावात योग्य निर्णय घेणे हीच नेतृत्वाची खरी व्याख्या
- मानसिक बळ हाच सैन्यातील प्रशिक्षणाचा पाया
- व्यक्तीसह समाजाचे स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

