चंदननगरमधील तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांना अटक

चंदननगरमधील तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांना अटक

Published on

पुणे, ता. ८ : चंदननगरमधील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात प्रेमसंबंधातील वादातून तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरू आहे.
लखन बाळू सकट (वय १८, रा. चंदननगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी लखनचा काका केशव बबन वाघमारे (वय ३२) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रथमेश शंकर दारकू (वय २०), यश रवींद्र गायकवाड (वय १९), जानकीराम परशुराम वाघमारे (वय १८), महादेव पांडुरंग गंगासागरे (वय १९) आणि बालाजी आनंद पेदापुरे (वय १९) (सर्व रा. बोराटे वस्ती, चंदननगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून लखन सकट आणि आरोपी यश गायकवाड यांच्यात वाद सुरू होता. शनिवारी (ता. ६) सायंकाळी सातच्या सुमारास यशने लखनला ऑक्सिजन पार्क परिसरात बोलावून घेतले. त्यावेळी झालेल्या वादातून यश आणि त्याच्या साथीदारांनी लखनला बेदम मारहाण करून तीक्ष्ण हत्याराने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत लखनला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवून पाच आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या खून प्रकरणात इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com