‘शबे-कद्र’च्या रात्री अवतरले पवित्र कुराण

‘शबे-कद्र’च्या रात्री 
अवतरले पवित्र कुराण
Published on

‘शबे-कद्र’च्या रात्री
अवतरले पवित्र कुराण

डॉ. एस. एन. पठाण (माजी कुलगुरू)

इस्लाम धर्माची चळवळ सुरू झाल्याबरोबर कुरेश (मक्केच्या लोकांस कुरेश अशी संज्ञा आहे) पुढाऱ्यांनी हजरत पैगंबरांना काबा मंदिरात प्रार्थना करण्यास मनाई केली. हजरत पैगंबरांचा मानभंग होईल, अशा अनेक गोष्टी कुरेशांनी राजरोस सुरू केल्या. ते जातील तेथे त्यांचा पाठलाग करून त्यांना हिणवणे, त्यांना रस्त्यावर अडविणे, ते प्रार्थनेस बसतील त्याठिकाणी काटेकुटे पसरून ठेवणे असे निंद्य प्रकार कुरेशानी सुरू केले. एकदा तर त्यांच्या डोक्यावर गटारातील घाण टाकली.
घरी गेल्यानंतर हजरत पैगंबरांची करुणास्पद अवस्था पाहून त्यांच्या मुलीस रडू कोसळले. हजरत पैगंबर आपल्या मुलीचे डोळे पुसत म्हणाले, ‘प्रिय मुली, रडू नकोस, एक दिवस परमेश्वर तुझ्या पित्याच्या साहाय्यास अवश्य धावून येईल.’ पुढे पुढे त्यांचा छळ होऊ लागला, तरीदेखील त्यांची आपल्या ध्येयावरील अचल श्रद्धा तिळमात्रही ढळली नाही.
ज्या इस्लाम धर्मात कोणतीही जात-उपजात, उच्च व कनिष्ठ, गरीब किंवा श्रीमंत असे न मानता केवळ समता व समानतेवर आधारलेला, सामान्य माणसांच्या सहज पचनी पडणारा, कोणतेही कर्मकांड अथवा अंधश्रद्धा न पाळणारा, कुणीही मध्यस्थ नसलेला आणि कोणत्याही ठिकाणी आकाशाखाली स्वच्छ जागी ईश्वराची करुणा मागता येईल, अशी व्यवस्था असणारा हा जो इस्लाम धर्म आज त्यांच्या अनुयायांपर्यंत पोहोचला, त्यासाठी धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांनी किती खस्ता खाल्ल्या, त्यांचा किती अनन्वित छळ झाला. हे पाहिले की, कुणाचेही डोळे पाणावतात. परंतु हजरत पैगंबर मात्र आपल्या तत्त्वापासून तसूभरही ढळले नाहीत.
मुस्लिम बांधव रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत म्हणजे २१, २३, २५, २७ किंवा २९ या विशेष तारखेला मशिदीवर रोषणाई करतात. मशिदीत प्रवचन असते. मशिदीत अथवा घरी प्रार्थना करून जास्तीत जास्त पुण्य (नेकी) मिळविण्याचा प्रयत्न करतात. याच रात्रीला ‘शबे-कद्र’ असे म्हटले जाते. भारतामध्येही ’शबे-कद्र’ची रात्र २६ व २७ व्या उपवासाच्या तारखेमध्ये पाहिली जाते. या रात्री पवित्र कुराण धर्तीवर अवतरले, अशी मुस्लिम बांधवांची श्रद्धा आहे. आज २७ व्या अत्यंत महत्त्वपूर्ण उपवास असल्यामुळे ‘शबे-कद्र’बद्दल अत्यंत थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

(लेखक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)

इफ्तार वेळ : ६.५० (शुक्रवारी सायंकाळी)
सहेरी वेळ : ५.१४ (शनिवारी सकाळी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com