गंभीर धनुर्वाताच्या रुग्णांवर ससूनमध्ये उपचार
पुणे, ता. २१ : कात्रज येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सोळावर्षीय मुलाच्या पायास पाच ते सहा दिवसांपूर्वी जखम झाली होती. त्याला तोंड न उघडणे, श्वास न घेता येणे या तक्रारी होत्या. त्याच्या तसेच, शिक्रापूर येथील ५५ वर्षीय व्यक्तीलाही श्वसनास त्रास होऊ लागल्याने दोघे ससून रुग्णालयात उपचाराकरिता भरती झाले. या दोन्ही रुग्णांची लक्षणे ही धनुर्वाताच्या आजाराची होती. दोन्ही रुग्ण हे अतिशय अत्यवस्थ अवस्थेत होते व दोघांनाही श्वसनाच्या गंभीर तक्रारी होत्या. मात्र, त्यांच्यावर ससूनमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले.
दोन्ही धनुर्वाताच्या रुग्णांना तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्यांना तत्काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येऊन योग्य औषधोपचार, प्रतिजैविके दिल्याने त्यांनी उपचारांना प्रतिसाद देऊन हळूहळू बरे होऊ लागले. जवळजवळ ४० दिवसांच्या रुग्णालयीन उपचारानंतर ते स्वतःच्या पायाने चालत घरी गेले. तसेच मागील एक वर्षात औषध वैद्यकशास्त्र विभागामार्फत धनुर्वाताच्या तीन रुग्णांवर यशस्वी उपचार झोले.
धनुर्वात हा जीवाणूंमुळे होणारा आजार असून, तो माती किंवा धूळ लागलेल्या जखमेतून शरीरात प्रवेश करतो. या जीवाणूने तयार होणाऱ्या विषामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो व शरीरात तीव्र स्नायूंचे झटके, तोंड न उघडणे, श्वास घेण्यास अडचण आदी लक्षणे दिसून येतात. योग्य वेळी उपचार न झाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. परंतु लसीकरणाने हा जीवघेणा आजार थांबविला जाऊ शकतो. जखम झाल्यानंतर त्वरित स्वच्छता आणि त्वरित धनुर्वात किंवा ‘टीटी’ची लस घेणे अत्यावश्यक असल्याची माहिती औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. हर्षल भितकर यांनी दिली. सदर दोन्ही रुग्णांवर औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एच. बी. प्रसाद, प्रमुख डॉ. हर्षल भितकर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अभिषेक अगिवाल, तसेच डॉ. साई भार्गव, डॉ. सुहास शिंदे, डॉ. प्रदीप पाटोळे, डॉ. अक्षय राठोड आणि डॉ. विक्रांत गायकवाड या निवासी डॉक्टरांनी अहोरात्र मेहनत घेतली. सोबत इन्चार्ज सिस्टर भारती नलावडे आणि रेखा पवार व इतर परिचारिकांनी औषधोपचार, पोषण आणि स्वच्छतेची जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडून दोन्ही रुग्णांना नवजीवन संजीवनी देण्यास मोलाचा हातभार लावला. त्यांना अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार व वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लापा जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.