महापालिका प्रशासनाने कंबर कसली
पुणे, ता. १६ ः राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच महापालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. इच्छुक उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी एक खिडकी योजना, उमेदवारांच्या खर्च मर्यादेवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथकाची निर्मिती, मतदार याद्या घरोघरी पोहोचविण्यापासून ते प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंतची तयारी पूर्ण करण्यावर महापालिकेने आत्तापासूनच भर दिला आहे.
महापालिकेमध्ये प्रशासक राज सुरू झाल्यानंतर चार वर्षांनी पुणे महापालिका निवडणुकीला सामोरी जाणार आहे. १५ जानेवारीला महापालिका निवडणूक होणार असून दुसऱ्याच दिवशी निकालही लागणार आहे. महापालिकेकडून निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर, रवी पवार उपस्थित होते. महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान यंत्रे लागणार आहेत. तेवढ्या यंत्रांची व्यवस्था महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यासाठी १३ हजार २०० बॅलेट युनिट व चार हजार ४०० कंट्रोल युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे.
आचारसंहितेचे पालनासाठी संनियंत्रण समिती
महापालिका निवडणुकीसाठी लागू झालेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी निवडणूक संनियंत्रण समिती तयार केली आहे. त्यामध्ये महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांचा समावेश असणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यानच्या घडामोडी, घटना, प्रचारफेऱ्या, सभा तसेच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी व्हडिओग्राफी सर्व्हेलन्स पथक तयार आहे. आचारसंहितेचे पालन न करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे काम भरारी पथक करणार आहे. मतदारांना प्रलोभने दाखविणे, त्यांच्यावर प्रभाव पाडणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी नाक्यांवर पथकेही तयार केली आहेत. तक्रारींच्या निवारणासाठी महापालिका व प्रभागनिहाय स्तरावर तक्रार निवारण केंद्र सुरू केले असल्याचे नवल किशोर राम यांनी सांगितले. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे जमा करून तत्काळ ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळावीत यासाठी ऑनलाइन अर्ज सेवा तयार केली आहे. त्यामध्ये करांची थकबाकी २४ तासांच्याआत एनओसी प्राप्त होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
महत्त्वाचे
१) तत्काळ ना हरकत प्रमाणपत्रासाठी (एनओसी) या संकेतस्थळावर करा अर्ज - nocelection.pmc.gov.in
२) ‘एनओसी’च्या अर्जासाठी आधार कार्ड, मतदार व प्रॉपर्टी क्रमांक करा अपलोड
३) निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’ची व्यवस्था
४) पोलिसांच्या मदतीने संवेदनशील केंद्रांवर महापालिका देणार विशेष लक्ष
५) मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिका करणार मतदार जागृतीवर
राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, याकडे महापालिका प्रशासन लक्ष देणार आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल. याबरोबरच संनियंत्रण समिती, भरारी पथके, एक खिडकी योजना, सीसीटीव्ही अशा विविध प्रकारांद्वारे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने व्हावी, यावर महापालिका भर देणार आहे.
-नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका पुणे
पुणे महापालिका निवडणुकीची वैशिष्ट्ये
- महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या - ३४ लाख ८१ हजार ३५९ (२०११ च्या जनगणनेनुसार)
- महापालिका क्षेत्रातील एकूण मतदार - ३५ लाख ५१ हजार ८५४
- पुरुष मतदारांची संख्या - १८ लाख ३२ हजार ४४९
- महिला मतदारांची संख्या - १७ लाख १९ हजार १७
- तृतीयपंथी मतदार संख्या - ४८८
- अनुसूचित जाती लोकसंख्या - ४ लाख ६८ हजार ६६३
- अनुसूचित जमाती लोकसंख्या - ४० हजार ६८७
- एकूण प्रभाग संख्या - ४१ (४ सदस्यीय प्रभाग -४०, ५ सदस्यीय प्रभाग -१)
- एकूण सदस्य संख्या - १६५ (पैकी महिलांसाठी राखीव - ८३)
- अनुसूचित जातीसाठी राखीव सदस्य संख्या - २२ (पैकी महिलांसाठी राखीव ११)
- अनुसूचित जमातीसाठी राखीव सदस्य संख्या - २ (पैकी महिलांसाठी राखीव १)
- नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव सदस्य संख्या - ४४ (पैकी महिलांसाठी राखीव २२)
- मतदान केंद्रांची संख्या - ४ हजार
- निवडणुकीसाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्या - २३ हजार ५००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

