माउली टाकळकर यांना ‘टाळयोगी पुरस्कार’
पुणे, ता. १८ ः वारकरी सांप्रदायिक आणि शास्त्रीय गायन परंपरेत गेल्या सत्तर वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले ज्येष्ठ टाळवादक ज्ञानेश्वर ऊर्फ माउली टाकळकर यांना त्यांच्या दीर्घ आणि समर्पित संगीत साधनेबद्दल ‘टाळयोगी पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. संगीत, वारकरी परंपरा आणि साधनेचा गौरव करणारा हा सोहळा रविवारी (ता. २१) सायंकाळी पाच वाजता मंगळवारपेठेतील सिद्धेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
माउली टाकळकर यांची जन्म आणि साधनाभूमी असलेल्या मंगळवार पेठेतील नागरिकांच्या पुढाकारातून श्री. ज्ञानेश्वर टाकळकर गौरव समिती, भारतीय वारकरी मंडळ, अद्वैत वारकरी भजनी महामंडळ, पश्चिम विभाग वारकरी भजनी मंडळ आणि वैष्णव वारकरी संस्था (हवेली) यांच्या संयुक्तविद्यमाने हा सन्मान सोहळा होणार आहे. रविवारी दुपारी तीन वाजता भारतीय वारकरी मंडळाच्या सर्व शाखांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ कीर्तनकार, शांतीब्रह्म मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार असून, वेदांताचार्य डॉ. नारायण महाराज जाधव यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार हेही पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजन समितीतील सुहास पवार आणि अनिल खेसे यांनी दिली.
----------
७७६५२

