उद्योगांसाठी ‘स्वागत सेल’ पोर्टल फायद्याचे
पुणे, ता. २३ : राज्यातील ४ लाख ४८ हजार उच्चदाब व लघुदाब औद्योगिक वीजग्राहकांना ऑनलाइन ‘स्वागत सेल’ पोर्टलद्वारे आतापर्यंत वाढीव वीजभार मंजूर करण्यात आला आहे, तसेच उद्योगांना वाढीव वीजभारासंदर्भातील प्रश्न व तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणसोबतच चोवीस बाय सात थेट संवाद साधण्यासाठी या पोर्टलद्वारे राज्यातील २७८ औद्योगिक संघटना जोडल्या गेल्या आहेत.
वीजपुरवठा, नवीन वीजजोडणी, बिलिंग व इतर मुद्द्यांबाबत औद्योगिक संघटना व ग्राहकांनी मांडलेल्या प्रश्नांच्या निराकरणासाठी महावितरणने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल माहितीसाठी या पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. त्यानुसार या पोर्टलद्वारे व बैठकांमध्ये प्राप्त झालेल्या विविध २४२ पैकी २१५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले, तर उर्वरित २७ प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन वीजयंत्रणा उभारण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
औद्योगिक वर्गवारीत लघु व उच्चदाबाच्या दरवर्षी सुमारे २३ हजारांवर नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. सद्यःस्थितीत औद्योगिक ग्राहकांचा एकूण वीजवापरात ४३ टक्के, तर महसुलात ४१ टक्के वाटा आहे. राज्यातील औद्योगिक ग्राहकांना थेट संवादासाठी, विविध प्रश्न मांडण्यासाठी तसेच प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्र ‘स्वागत सेल’ पोर्टल कार्यान्वित केले आहे. त्यामुळे लघु व उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना वीजभार वाढीसह विविध ग्राहकसेवांसाठी मागणी अर्ज, तसेच वीजपुरवठा व बिलिंगबाबतच्या तक्रारी करणे सोयीचे झाले आहे. यासह वीजसेवेसंबंधी सूचना, प्रश्न किंवा विविध मुद्द्यांवर थेट संवाद साधण्यासाठी औद्योगिक संघटनांना स्वतंत्र लॉगिनद्वारे ‘स्वागत सेल’ पोर्टलवर विशेष स्थान देण्यात आले आहे. राज्यातील २७८ औद्योगिक संघटनांनी लॉगिनद्वारे नोंदणी केली आहे. यात पुणे प्रादेशिक विभागातील ८७, कोकण- ८३, नागपूर- ८० आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील २८ औद्योगिक संघटनांचा समावेश आहे.

