ख्रिसमसनिमित्त शहर ‘फेस्टिव्ह मोड’मध्ये

ख्रिसमसनिमित्त शहर ‘फेस्टिव्ह मोड’मध्ये

Published on

राधिका वळसे-पाटील, सकाळ वृत्तसेवा
----------------
पुणे, ता. २४ : येशू ख्रिस्तांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी शहरातील चर्च, मॉल, कॅफे, हॉटेल्स, रस्ते ते घराघरापर्यंत उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्रीनंतर शहरात सेलिब्रेशनला उधाण आले होते. शहरातील विविध चर्चमध्ये पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रेड अँड व्हाइट थीम ड्रेस, सांताक्लॉज टोपी, फेस पेंटिंग आणि सेल्फी पॉइंट्समुळे संपूर्ण शहर ‘फेस्टिव्ह मूड’मध्ये रंगून गेले होते.

कॅम्प, डेक्कन, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, औंध, वानवडी, कात्रज आदी परिसरांतील चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी दिवे, फुलांची सजावट करण्यात आली होती, तसेच विविध मंडळे आणि चर्चमध्ये येशुजन्माचे देखावेदेखील उभारले गेले आहेत, तर चर्चमध्ये मध्यरात्रीनंतर विशेष प्रार्थना, कॅरोल गायन आणि पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ख्रिसमसपूर्व संध्याकाळपासूनच शहरातील रस्त्यांवर उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला.

शहरातील चौकाचौकांत सांताक्लॉजच्या लाल टोप्या, मुखवटे, ख्रिसमस ट्री, मेणबत्त्या आणि सजावटीच्या वस्तू विकणारे विक्रेते नागरिकांचे लक्ष वेधून घेताना पाहायला मिळाले आणि तेच वातावरण आज दिवसभर शहरातील मुख्य परिसरात पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये ख्रिसमसचे खास थीम डेकोरेशन करण्यात आले होते. भव्य ख्रिसमस ट्री, झगमगती रोषणाई, बर्फवृष्टीसारखा सजावटीचा अनुभव नागरिकांना आकर्षित करत होता. सांताक्लॉजचा वेष परिधान केलेली मंडळी लहान मुलांसोबत फोटो काढताना दिसत होती. अनेक मॉलमध्ये सांताक्लॉजकडून चॉकलेट, टॉफी, भेटवस्तू आणि ‘गुडी बॅग’चे वाटप करण्यात आले. हॉटेल्स आणि कॅफेमध्ये तर लाइव्ह म्युझिक, कॅरोल सिंगिंग, डीजे नाईट आणि थीम पार्टींचे आयोजन करण्यात आले होते. नाताळनिमित्त शुभेच्छापत्रे, भेटवस्तू, आकर्षक पॅकिंगमध्ये ठेवलेली चॉकलेट आणि रंगीबेरंगी मेणबत्त्यांनी दुकाने सजली होती.
------------------
कॅम्प परिसर ठरतोय उत्सवाचा केंद्रबिंदू
कॅम्प परिसर हा ख्रिसमस साजरा करण्याचा पारंपरिक केंद्रबिंदू असल्याने येथे विशेष उत्साह पाहायला मिळाला. चर्च परिसरात भव्य रोषणाई, येशुजन्माचे देखावे, तसेच रात्री उशिरापर्यंत मेणबत्ती प्रार्थना आणि मिरवणुका काढण्यात आल्या. पेटत्या मेणबत्त्या हातात घेऊन प्रार्थना करत नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते. कॅरोल्स गात, एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत ही मिरवणूक मार्गस्थ झाली. या मिरवणुकीत सांताक्लॉजने लहानग्यांना चॉकलेट आणि भेटवस्तू देत ख्रिसमसचा आनंद द्विगुणित केला. पारंपरिक प्लम केक आणि घरगुती खाद्यपदार्थांची लगबग रस्त्यांवर दिसून आली. काही हाउसिंग सोसायट्यांमध्ये खास विद्युत रोषणाई, ख्रिसमस ट्री, मुलांसाठी गिफ्ट्स, गेम्स आणि बॉनफायरच्या माध्यमातून मैफली रंगल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com