पुण्याच्या विकासासाठी एकत्र लढण्याची गरज

पुण्याच्या विकासासाठी एकत्र लढण्याची गरज

Published on

पुणे, ता. २३ : ‘‘पुण्याच्या विकासासाठी एकत्र येऊन निवडणूक लढली पाहिजे. पुण्यात चांगला बदल हवा असेल, तर एकत्र येऊन लढण्यास आमचे प्राधान्य असणार आहे,’’ असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पुन्हा एकदा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सामावून घेणार असल्याचे सूतोवाच केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुळे यांनी बुधवारी डेंगळे पुलाजवळील राष्ट्रवादी काँग्रेस भवन या पक्ष कार्यालयात दिवसभर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, ‘‘अजित पवार यांच्याशी माझी भेट झालेली नाही, मात्र स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. मी कोणालाही भेटायला तयार आहे. सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलूनच मी अजित पवार यांच्याशी बोलणार आहे. पूर्ण शंका निरसन होत नाही, तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. सर्व जबाबदारी माझी असणार आहे. पुण्याच्या विकासासाठी एकत्र येऊन निवडणूक लढली पाहिजे. पुण्यात चांगला बदल हवा असेल, तर एकत्र येऊन लढण्यास आमचे प्राधान्य असणार आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मनसे आणि काँग्रेस यांच्यासमवेत आमची चर्चा सुरू आहे.’’

जगतापांच्या नाराजी नाट्याला धुडकावले
‘‘लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, नाराजी घरी चालते. प्रशांत जगताप यांना मुंबईत मागील दोन दिवस सहा तास देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांच्या सगळ्या मागण्या १०० टक्के मान्य केल्या. त्यांच्या मनात काही वेगळे असेल, याबाबत मला माहिती नाही. मात्र पुण्याच्या हिताचाही विचार केला पाहिजे. सगळ्या कार्यकर्त्यांचे मत विचारत घेऊनच पक्ष निर्णय घेईल,’’ अशा शब्दांत सुळे यांनी जगताप यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली.

शरद पवारच निर्णयाचा केंद्रबिंदू
महापालिका निवडणुकीमध्ये कोणाला बरोबर घ्यायचे, उमेदवारांची तयारी कशी आहे? माझ्या सभा, प्रचारयात्रा कशा होणार? मी त्यांना काय मदत करू शकते? याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांची ‘मन की बात’ जाणून घेतली. त्यानंतर धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतो. शरद पवार हे जो काही निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, निर्णयाचा केंद्रबिंदू पवारच असतील, असेही सुळे यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या....
- जी रामजी विधेयकातून महात्मा गांधी यांचे नाव वगळले
- भाजपने मनरेगा योजनेतूनही गांधींचे नाव काढले
- गरिबांना मनरेगातून मिळणारा निधी आता मिळणार नाही
- विशाल तांबे यांनी निवडणूक लढावी, अशी माझी इच्छा होती
- घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याबाबतची चर्चा माझ्या कानावर आलेली नाही
- पुण्यात पाणी, कचरा, वाहतूक कोंडी, वायू-जल प्रदूषणासारखे प्रश्‍न गंभीर आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com