जलजन्‍य आजाराने पुणेकर बेजार  
अतिसार, गॅस्‍ट्रो, टायफॉईड व काविळीच्या रुग्णसंख्येत वाढ

जलजन्‍य आजाराने पुणेकर बेजार अतिसार, गॅस्‍ट्रो, टायफॉईड व काविळीच्या रुग्णसंख्येत वाढ

Published on

पुणे, ता. १७ ः एकीकडे हवामान व वातावरणातील झालेल्‍या बदलामुळे, तसेच तापमानाच्‍या परस्‍परविरोधी बदल आणि ढगाळ वातावरणामुळे विषाणूजन्‍य आजारांनी पुणेकर आजारी पडलेले असतानाच दुसरीकडे जलजन्‍य आजारांनी देखील डोके वर काढले आहे. अतिसार, गॅस्‍ट्रो, टायफॉईड व काविळीच्या रुग्‍‍णांची संख्‍या देखील वाढली आहे. जानेवारीपासून जुलैपर्यंत पुणे शहरात अतिसाराचे ६ हजार २७०, गॅस्‍ट्रोचे १३७, काविळीचे (व्हायरल हेपॅटायटीस) ८५ आणि १३० टायफॉइडचे रुग्‍णसंख्‍या आरोग्‍य विभागाकडे नोंदली गेली तर कॉलराचा एकही रुग्‍ण आढळलेला नाही.
या आकडेवारीवरून जलजन्य आजारांचे धोके अद्याप मोठ्या प्रमाणावर कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. बदललेल्‍या वातावरणामुळे विषाणूजन्‍य आजारांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. गेल्‍या दोन महिन्‍यांपासून ऊनही पडत नसल्‍याने आधीच वातावरण बदलाने लहान- मोठ्यांना आजारपणामुळे गाठले आहे. मुलांमध्‍ये त्‍याचे प्रमाण जास्‍त आहे. त्‍याचबरोबर पुणे परिमंडळाच्या आरोग्‍य उपसंचालक कार्यालयाकडील रुग्‍णनोंदीनुसार दूषित पाण्‍यापासून होणाऱ्या आजारांची संख्‍याही वाढलेली दिसून येत आहे. त्‍याचप्रमाणे पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण भागातही रुग्‍णसंख्‍या चांगलीच वाढलेली दिसून येत आहे. त्‍याचबरोबर सातारा, सोलापूर जिल्ह्यांतही अतिसार, गॅस्ट्रो, टायफॉईड आणि काविळीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत.
पावसाळ्यात जलजन्य आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः गॅस्ट्रो, टायफॉईड आणि जुलाब हे आजार दूषित पाणी व अस्वच्छ अन्नामुळे सहज पसरतात. गॅस्ट्रो म्हणजे पोट व आतड्याचा दाह होय. यामध्ये जुलाब, उलट्या, पोटदुखी व ताप अशी लक्षणे दिसतात. दूषित पाणी वा अन्न सेवन केल्याने हा आजार उद्भवतो. वेळेत उपचार न केल्यास रुग्ण अशक्तपणा आणि निर्जलीकरण होते. तर, टायफॉईड हा ‘सॅल्मोनेला टायफी’ नावाच्या जिवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. रुग्णाला सतत ताप, पोटदुखी, डोकेदुखी, बद्धकोष्ठता किंवा जुलाब तसेच थकवा जाणवतो. हा आजार दीर्घकाळ टिकू शकतो आणि योग्य उपचार न घेतल्यास गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

जलजन्य आजारांची कारणे....
आरोग्य विभागाच्या मते पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता, अन्नपदार्थांची गैरसोय आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे जलजन्य आजारांची संख्या वाढते. नागरिकांनी उकळलेले व फिल्टर केलेले पाणी वापरावे. तर, रस्त्यावर मिळणारे अन्नपदार्थ टाळावेत, तसेच हात वारंवार स्वच्छ धुवावेत, असे आवाहन पुणे विभागाचे प्रभारी आरोग्‍य उपसंचालक डॉ. नागनाथ यमपल्‍ले यांनी केले आहे.
..............
जलजन्‍य आजारांपासून असा करा बचाव ः
– नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच प्या.
– रस्त्यावर मिळणारे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्न टाळा.
– हात साबणाने वारंवार धुवा
– पालेभाज्या, फळे स्वच्छ धुऊनच वापरा.
– आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
---.......
पुणे परिमंडळातील जलजन्‍य आजारांची रुग्‍णसंख्‍या, जानेवारी ते जुलै २०२५ (स्रोत ः आरोग्‍य उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग)

जिल्हा / महापालिका – कॉलरा – अतिसार– गॅस्ट्रो – टायफॉईड – कावीळ

पुणे महापालिका– ०– ६२७०– १३७– १३० – ८५
पिंपरी चिंचवड – ० – ८०९० – ३३१– २० – ४
पुणे जिल्हा– २ – ५२२५ – ० – २११ – १०
सोलापूर महापालिका– ० – १ – १०८६ – ९ – ४५
सोलापूर जिल्हा – ० – ३८९५– ०– १४५ – १
सातारा ० – ९७८५– ० – ३९९ – १
एकूण – २ – ३३२६६ – १५५४ – ९१४ – १४६
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com