सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश
पुणे, ता. ३० : ऑनलाइन शेअर ट्रेडिंग आणि आयपीओमधून प्रचंड नफा मिळवून देण्याच्या आमिषाने नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. फसवणुकीची रक्कम हस्तांतर करण्यासाठी बँक खाती व सिमकार्ड उपलब्ध करून देणाऱ्या टोळीचे पाळेमुळे उघडकीस आणत आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ६० लाखांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट कंपनीमार्फत शेअर ट्रेडिंगमधून भरघोस फायदा होईल, असे सांगून आरोपी दिव्यांशी अग्रवाल आणि अशोक रेड्डी यांनी फिर्यादींना कॉल्स आणि व्हॉट्सअॅप चॅटच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांना ‘त्रशुन्या’ अॅप डाऊनलोड करायला लावून शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याचा बनाव करून ६० लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
तपासात फसवणूक झालेल्या रकमेपैकी १४ लाख ३० हजार रुपये एका फायनान्स बँकेच्या शिवणेतील ‘आदियोगी स्क्रॅप अँड वेस्ट मॅनेजमेंट एलएलपी’ कंपनीच्या खात्यावर हस्तांतर झाल्याचे निष्पन्न झाले. या कंपनीचा संचालक अनिकेत प्रशांत भाडळे (रा. शिवाजीनगर गावठाण) याला अटक करण्यात आली.
टोळीमध्ये नेपाळी तरुणांचा सहभाग
तपासादरम्यान नऱ्हेतील एका हॉटेलमधून नेपाळी नागरिक नोरबु शेर्पा (वय २८), अंग नुरी शेर्पा (वय २१), सागर मच्छिंद्र गायकवाड (वय २६, रा. गणेशमळा, सिंहगड रस्ता) आणि शिवतेज अशोक गुंजकर (वय ३३, रा. जांभूळवाडी, आंबेगाव) यांना अटक करण्यात आली. हे आरोपी फसवणुकीची रक्कम हस्तांतर करण्यासाठी बॅंक खाते व डिजिटल साधनांचा वापर करत होते. त्यांच्या ताब्यातून दहा मोबाईल, दहा पेन ड्राईव्ह, ५३ बँकांचे डेबिट कार्ड, १७४ सिमकार्ड, ५५ चेकबुक, चार लॅपटॉप, २७ क्यूआर कोड, स्वाइप मशिन, डीव्हीआर, चार हार्ड डिस्क आदी डिजिटल साहित्य जप्त केले आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलिस निरीक्षक संगीता देवकाते, सहाय्यक फौजदार संदेश कर्णे, पोलिस अंमलदार प्रवीणसिंग राजपूत, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, जान्हवी भडेकर, प्रशांत बोऱ्हाडे आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.