पुणे पालिकेच्या निष्काळजीपणाने मुलाचा मृत्यू

पुणे पालिकेच्या निष्काळजीपणाने मुलाचा मृत्यू

Published on

पुणे, ता. १ : पुणे महापालिकेच्या हलगर्जी आणि निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा स्वच्छतागृहाच्या टाकीत बुडून मृत्यू झाला, असा ठपका ठेवत त्याच्या कुटुंबीयांना ११ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. दिवाणी न्यायाधीश विक्रमसिंग भंडारी यांनी हा निकाल दिला.
तुषार बाबू रामोशी असे मृत्यू झालेल्या १२ वर्षीय मुलाचे नाव आहे. नऊ एप्रिल २०१८ ला कसबा पेठ परिसरात त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पुणे महापालिका, आयुक्त, बांधकाम व नियंत्रण विभाग आणि आरोग्य विभागाच्या प्रमुखांविरोधात दावा दाखल केला होता. तुषार याची आई जयश्री रामोशी या घरेलू कामगार तर वडील बाबू ऊर्फ मानसिंग बिगारी काम करतात. घटनेच्या दिवशी तुषार रात्री साडेआठच्या सुमारास शौचासाठी गेला, मात्र बराच वेळ परत आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. तेव्हा तो स्वच्छतागृहाच्या पाण्याच्या टाकीत तरंगत असल्याचे दिसून आले. त्याला बाहेर काढून दवाखान्यात नेले असता त्याचा बुडाल्यामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालातूनही ते स्पष्ट झाले. त्यामुळे पुणे महापालिका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणासह निष्काळजी आणि कर्तव्यात कसूर केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे नमूद करत रामोशी दांपत्यांनी अ‍ॅड. अमित राठी व अ‍ॅड. पूनम मावाणी यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली. त्यांना अ‍ॅड. आदित्य जाधव व अ‍ॅड. प्राची जोग यांनी सहकार्य केले. कुटुंबीयांची मुद्रांक शुल्क देण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांनी ११ लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी करत त्यावर १२ टक्के व्याज मिळावे म्हणून न्यायालयाकडे मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.


शौचासाठी घरून पाणी नेणे अपेक्षित
स्वच्छतागृहात बांधलेली टाकी ही शौचालय धुण्यासाठी व पाणी साठविण्यासाठी आहे. नागरीकांना शौचालयात पाणी घेऊन जाण्यासाठी टाकी बांधलेली नाही. नागरिकांनी त्यांच्या घरामधून पाणी घेऊन जाणे व ते वापरणे अपेक्षित आहे. पूर्वीपासून नागरिक तसेच करतात. घडलेली घटना दुर्दैवी असून पालकांच्या दुर्लक्षामुळे ती घडली आहे, असा बचाव करत दावा फेटाळण्याची मागणी महापालिकेने केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com