माल, खासगी प्रवासी वाहतूक होणार ठप्प
पुणे, ता. १ ः वाहतूक पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने कारवार्इ होत असल्याचा आरोप, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मालवाहतूक वाहनांना प्रवेशबंदी आणि शहरातील बाजारपेठांमध्ये मालवाहतुकीवर असलेल्या निर्बंधांविरोधात सोमवारी (ता. १) मध्यरात्रीपासून माल वाहतूक करणाऱ्या वाहन संघटनांकडून बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. ट्रक, टेम्पो, टँकर व कंटेनर वाहनधारकांनी कामबंद आंदोलनाची हाक दिली असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या पुणे शाखेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. महासंघाचे अध्यक्ष शशिकांत डोंबे, चंद्रकांत हरपळे आणि अनिल चाकोते यांनी सांगितले की, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणाऱ्या मालाच्या आवकसाठी दररोज हजारो मालवाहने ये-जा करतात. मात्र, या वाहनांना प्रवेशबंदी केल्याने शेतकरी, व्यापारी, मजूर आणि वाहनचालकांना मोठा आर्थिक फटका बसतोय. इंधन आणि वेळेचा अपव्ययही वाढतोय. यामुळे वाहनचालकांत तीव्र नाराजी आहे. याशिवाय वाहतूक विभागाकडून वाहनांवर अन्यायकारक पद्धतीने ई-चलन केल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. या सर्व कारणांनी संतप्त झालेल्या वाहतूक संघटनांनी एक जुलैच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. उदय बर्गे, बाबा शिंदे आणि इतर वाहतूक संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. शालेय बस व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संस्थांनी काही दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र, ट्रक, टेम्पो, टँकर आणि कंटेनर चालकांचा संप आजपासूनच सुरू होणार आहे, असे बर्गे यांनी सांगितले.
लक्झरी बस वाहतूक पूर्ण बंद
दरम्यान, पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर यांनी लक्झरी बस वाहतूक पूर्ण बंद करण्याचा इशारा दिला आहे. पार्किंगच्या समस्यांपासून ई-चलनांपर्यंत प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत बेमुदत संप सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनांनी केला आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची गैरसोय होणार आहे, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.
शहरात जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिस कारवाई करीत आहेत. त्यामुळे अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फुले तसेच औषधांची वाहतूक करणारी वाहने आंदोलनात सहभागी होणार आहेत. रिक्षा आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस चालकांची बैठक सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत ते आंदोलनात सहभागी होण्याबाबत निर्णय कळविणार आहेत. आम्ही आंदोलनावर ठाम आहोत.
- डॉ. बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक व प्रतिनिधी महासंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.