सोन्याच्या भावात जूनअखेर पुन्हा वाढ
पुणे, ता. २ ः सोने आणि चांदीच्या भावात गेल्या तीन महिन्यांत लक्षणीय चढ-उतार झाले आहेत. गेल्या महिन्यात एक लाखाचा टप्पा पार केलेले सोने आता पुन्हा ९८ हजार रुपयांच्या घरात आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरची किंमत, पश्चिम आशियातील तणाव, मध्यवर्ती बँकांचे धोरण यांचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या भावावर झाला आहे. सोन्याच्या भावात एप्रिलमध्ये थोडी घसरण झाली असली तरी, जूनच्या अखेरीस भाव पुन्हा तेजीत आले. चांदीच्या भावाने मात्र स्थिरपणानंतर थेट वाढीचा टप्पा गाठला आहे.
एप्रिलच्या सुरुवातीला प्रति दहा ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ८४ हजार ४४४ रुपये होता. तो भाव १५ एप्रिलला ८६ हजार ३९७ रुपयांपर्यंत गेला. मेमध्ये किंचित चढ-उतार झाले असून, जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा भाव ९२ हजार ३४९ इतका होता. जुलैच्या सुरुवातीस तो कमी होऊन ९० हजार २९४ रुपये इतका झाला आहे. २४ कॅरेट सोन्याचा भावही त्याच प्रमाणात वाढला आहे.
चांदी काहीशी स्थिरावली
गेल्या आठवड्यातील आकडेवारीवरून स्पष्ट होते की, २५ जूननंतर सोन्याच्या भावात रोजचे सौम्य चढ-उतार झाले. २७ जूनला किंचित घसरण झाली असली तरी एक जुलैला पुन्हा भाव वधारला आहे. चांदीच्या भावात मात्र सातत्याने वाढ होत असून, २६ जूनला प्रतिकिलो भाव एक लाख ७६०० रुपयांपर्यंत पोचला होता. नंतर थोडी घसरण होऊन दोन जुलैला तो एक लाख ६४०० वर स्थिरावला आहे.
भाव मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता कमीच!
सोन्याचा भाव एप्रिलपासून सातत्याने वाढत असून केवळ दोन महिन्यांत ९० हजार रुपयांचा टप्पा सहज पार केला आहे. तात्पुरती घट जरी काही दिवस दिसली तरीही दीर्घकालीन चित्र हे सोन्याच्या भावात अधिक वाढीचेच संकेत देते. गुंतवणूकदारांसाठी ही स्थिती फायद्याची असून भाव गडगडतील, अशी शक्यता कमीच आहे, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
एप्रिलपासून सोन्याच्या भावात झालेले बदल (सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम)
तारीख - २२ कॅरेट - २४ कॅरेट - चांदी (१ किलो चांदी)
०१/०४/२०२५ ८४,४४४ ९१,७०८ १,०१,७००
१५/०४/२०२५ ८६,३९७ ९३,८२९ ९५,८३०
०१/०५/२०२५ ८६,६७६ ९४,१३२ ९५,०००
१५/०५/२०२५ ८५,०९५ ९२,४१५ ९५,०००
०१/०६/२०२५ ८८,२११ ९५,७९९ ९७,८५०
१५/०६/२०२५ ९२,३४९ १,००,२९३ १,०७,१००
०१/०७/२०२५ ९०,२९४ ९८,०६१ १,०७,५००
गेल्या आठ दिवसांतील भाव (सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम)
तारीख - २२ कॅरेट - २४ कॅरेट - चांदी (१ किलो चांदी)
२५/०६/२०२५ ९०,०२४ ९७,७६८ १,०६,३००
२६/०६/२०२५ ९०,०२४ ९७,७६८ १,०७,६००
२७/०६/२०२५ ८९,०९४ ९६,७५८ १,०७,४००
२८/०६/२०२५ ८८,७२२ ९६,३५४ १,०६,५००
२९/०६/२०२५ ८८,७२२ ९६,३५४ १,०६,५००
३०/०६/२०२५ ८८,७२२ ९६,३५४ १,०६,५००
०१/०७/२०२५ ९०,२९४ ९८,०६१ १,०७,५००
०२/०७/२०२५ ९०,२१० ९७,९७० १,०६,४००
भाववाढीची प्रमुख कारणे
- जागतिक भू-राजकीय अस्थिरता
- जागतिक चलन बाजारातील अनिश्चितता
- डॉलरच्या दरात चढ-उतार झाल्याने भारतात सोने महागले
- पश्चिम आशिया आणि युक्रेन-रशिया युद्धामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने-चांदीकडे कल
- आंतरराष्ट्रीय मागणी आणि साठवणूक वाढ
- गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक वाढवली
एप्रिलपासून जून अखेरपर्यंत सोन्याचे भाव सरासरीने वधारले असून जुलैच्या सुरुवातीला थोडी घसरण दिसत आहे. चांदीच्या बाबतीत जूनमध्ये तीव्र वाढ नोंदवली गेली. हळूहळू आर्थिक स्थैर्य निर्माण झाले, तर येत्या काळात भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे; परंतु कोणत्याही राजकीय किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे पुन्हा एकदा तेजी येऊ शकते.
- अतुल अष्टेकर, भागीदार, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.