‘एनआयव्ही’ला दिलेल्या जागेसाठी प्रयत्न
पुणे, ता. २ ः बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालयाकडून तब्बल ९९ वर्षांच्या करारावर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला (एनआयव्ही) वापरण्यासाठी दिलेल्या सुमारे आठ हजार चौरस मीटर (दोन एकर) जागेच्या कराराची मुदत संपत आली आहे. ही जागा परत मिळावी, अशी मागणी ससून रुग्णालयाने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केली आहे. या जागेचा करार पुढील वर्षी (२०२६) संपत असल्याने ती जागा ससूनला मिळाल्यास रुग्णालयाचा आणखी विस्तार करता येणे शक्य आहे.
ससून रुग्णालय प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पुढील वर्षी जून २०२६ मध्ये ‘एनआयव्ही’बरोबर केलेला करार समाप्त होत असून, तो करार पुन्हा नूतनीकरण करण्यात येऊ नये. ती जागा पुन्हा ससून रुग्णालयाला मिळावी, असे या पत्रव्यवहारात म्हटले आहे. पुण्यात ‘एनआयव्ही’चे कार्यालय व प्रयोगशाळा ससूनपासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर आंबेडकर रस्त्यावर आहे. ती ससूनने दिली आहे. या ठिकाणी विषाणूंवर संशोधन चालते, तसेच विविध आजारांचे नमुनेदेखील तपासणी करण्यासाठी येतात. केंद्रीय आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या या संस्थेचा पाषाण येथे काही एकरांमध्ये विस्तार केला आहे. त्यांचे कार्यालय आहे. रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ही जागा मिळाल्यास रुग्णसेवेचा आणखी विस्तार करता येईल व नवीन सुविधा राबविणे शक्य होईल. करार २०२६ मध्ये पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.
ससून रुग्णालयाचा आढावा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नुकताच घेतला. त्यावेळीदेखील या जागेबाबत रुग्णालय प्रशासनाने प्रस्ताव तयार करून तो पाठवण्याचे निर्देश ससून रुग्णालयाला त्यांनी दिले आहेत. हा प्रस्ताव प्राप्त झाल्यावर याबाबत जिल्हाधिकारी आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे त्या म्हणाल्या. तसेच एप्रिल महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील याबाबत चर्चा केली असून, तेदेखील ही जागा पुन्हा मिळावी यासाठी आग्रही असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
जागेचा फायदा ससूनला कशासाठी होईल?
- बहुविध उपचार शाखा असलेले रुग्णालय (मल्टिस्पेशालिटी) उभारता येईल
- दंतवैद्यकीय रुग्णालय, फिजिओथेरपी महाविद्यालयासाठी जागा
- पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सोयीसुविधा
- ससूनपासून ३०० मीटर अंतरावर जागा असल्याने ससूनचे अनेक विभाग स्थलांतरित करता येतील
ससून हे तृतीयक स्वरूपाच्या वैद्यकीय सेवा देणारे (टर्शरी केअर) रुग्णालय असून, सध्या रुग्णालयात विविध सोयीसुविधा उभ्या करण्यासाठी जागेचा मोठा अभाव आहे. ‘एनआयव्ही’सोबतचा करार संपल्यामुळे ती जागा आम्हाला हवी आहे आणि आम्ही वैद्यकीय शिक्षण विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाला यासंदर्भात प्रस्ताव सादर केला आहे.
- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.