पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात ‘ऑरेंज’ अलर्ट
पुणे, ता. २ : हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या भागात ऑरेंज अलर्ट देखील जारी केला आहे. शहरात येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता देखील हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, शहरात कमाल तापमान २८७ अंश सेल्सिअस इतके तर २२.४ इतके किमान तापमान नोंदविण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी (ता. १) हजेरी लावली. परिणामी कमाल तापमानात किंचित घट नोंदविण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमानात घट होणार असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार पुणे आणि परिसरात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर पहाटे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दिवसभर पावसाचा किंचित शिडकावा पडला. तर, सायंकाळी आठ वाजता हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक विस्कळित झाल्याने कोंडीचा सामना करावा लागला.
गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या घट विभागात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढणार असून तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. तर शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
गंगेचा पश्चिम बंगाल व उत्तर ओडिशालगतच्या परिसरावर असलेला कमी दाबाचा पट्टा आता झारखंड आणि शेजारील भागांवर स्थिरावलेला आहे. त्यासोबत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील २४ तासांत हळूहळू पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे झारखंडच्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.
आजचा पावसाचा अंदाज
पुणे आणि परिसरात गुरुवारी (ता. ३) आकाश अंशतः ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून कमाल तापमान २६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.