महिलेवर अत्याचार, खूनप्रकरणी जन्मठेप
पुणे, ता. ३ ः महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करत जखमी अवस्थेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने जन्मठेपेसह ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा निकाल दिला. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. अत्याचार केल्यानंतर आरोपी महिलेच्या अंगावरील सोने लुटून पसार झाला होता.
राजेश मनीराम यादव (रा. वाकडेवाडी, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना १८ फेब्रुवारी २०१५ रोजी शिवाजीनगर येथील अनुतेज अथर्व सोसायटीत घडली होती. महिला ही घरात एकटीच राहत होती. त्याचा फायदा घेत यादव याने तिच्याशी ओळख वाढविली. घटनेच्या दिवशी महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्या घरी जात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यास महिलेने विरोध केला असता, त्याने रागाच्या भरात तिचे तोंड दाबले. त्यानंतर सुरीने तिच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असताना त्याने तिच्यावर अत्याचार केला. या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. अत्याचारानंतर पळून जात असताना त्याने महिलेच्या कानातील सोन्याचे टॉप्स, पायातील चांदीचे पैंजण, मोबाईल तसेच तीन हजार रोकड नेली. महिलेच्या घराचे दार उघडे असल्याने शेजारचे तिच्या घरात आले. तेव्हा त्यांना महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.
या प्रकरणी महिलेच्या मुलाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे अॅड. लीना पाठक यांनी पाहिले. त्यांनी १६ साक्षीदार तपासले. युक्तिवादादरम्यान वैद्यकीय अहवाल, आरोपीच्या बोटांचे ठसे हा पुरावा महत्त्वाचा ठरला. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा युक्तिवाद अॅड. पाठक यांनी केला. न्यायालयाने तो मान्य करत आरोपीला जन्मठेपेसह ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. पोलिस हवालदार टी. जी. शेख, ए. आर. कांबळे, एफ. एल. सोनवणे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.