पंजांची डावी- उजवी कार्यक्रम उत्साहात
पुणे, ता. ३ : ‘बारा इमाम के दो चारो दिन... या अली... या इलाह इल्ललाह... हजरत इमाम हुसेन के दो चारो दिन...’च्या जयघोषात बारा इमाम दर्गा व हजरत सय्यद शाह बाबा दर्गा पंजांच्या डावी- उजवी या धार्मिक कार्यक्रमानिमित्त आज मिरवणूक काढण्यात आली होती. मुस्लिम धर्मियांसह सर्वधर्मीय नागरिक त्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या वेळी शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर दोन्ही पंजांची डावी-उजवी झाल्यावर पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या.
बारा इमाम दर्गा येथून आणि हजरत सय्यद शाहबाबा दर्गा येथून पंजे घेऊन मिरवणुका निघाल्या. त्यानंतर दोन्ही मिरवणुका शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर आल्या. तेथे दोन्ही पंजांची पारंपरिक पद्धतीने भेट झाली. पंजांचे दर्शन घेण्यासाठी बहुसंख्येने भाविक उपस्थित होते. पंजांचे आगमन होताच उत्साहात स्वागत करण्यात आले. मिरवणूक मार्गावर पंजाला फुलांचा सेहरा वाहण्यात आला. नागरिकांमार्फत मिरवणुकीतील भाविकांना सरबतवाटप करण्यात येत होते.
प्रथेप्रमाणे चौकीसमोर दोन्ही पंजांनी पाच प्रदक्षिणा घातल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड, शीतल जाधव, पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे आणि संतोष गोरे यांच्या हस्ते दोन्ही पंजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
बारा इमाम दर्ग्याचे फारुक अहमद इस्माईल सिद्दिकी म्हणाले, ‘‘मिरवणुकीत वाघाची निशाणी (झुल्फिकार) असते. भाविक श्रद्धेने वाघाच्या रंगांच्या पट्ट्यांनी त्यांच्या मुलांना सजवतात. ही धार्मिक प्रथा व परंपरा आहे.’’
हजरत सय्यद शाह दर्ग्याचे मुजावर सलीम अब्दूल अझीझ बोजगर म्हणाले, ‘‘डावी-उजवीचा कार्यक्रम झाल्यावर बाबांच्या दर्ग्यावर सर्वधर्मीय नागरिकांसाठी नैवेद्य वाहिले. त्यानंतर खिचडीचा भंडारा झाला. तो रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होता. दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.