कोंढव्यात अभियंता तरुणीवर बलात्कार

कोंढव्यात अभियंता तरुणीवर बलात्कार

Published on

पुणे, ता. ३ : ‘कुरिअर बॉय’ म्हणून घरी आलेल्या तरुणाने एका २२ वर्षीय अभियंता तरुणीच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारत बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी सायंकाळी घडली. त्यानंतर आरोपीने तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढत ‘मी पुन्हा येईन’ अशी धमकीही दिली. या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांची दहा विशेष पथके आरोपीच्या मागावर आहेत.
या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ६४, ७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचे भासवून सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सोसायटीत प्रवेश मिळवला. तरुणी अकराव्या मजल्यावर घरी एकटीच होती. आरोपीने घरी जाऊन ‘बँकेतून कुरिअर असून पोच द्या, माझ्याकडे पेन नाही,’ असे सांगितले. मात्र, तरुणी म्हणाली की, ‘कुरिअर माझे नाही,’ तरीही ‘सही करावी लागेल’ असा आग्रह धरला. त्यामुळे तिने सेफ्टी डोअर उघडला. तरुणी पेन घेण्यासाठी घरामध्ये आत गेली, त्याच क्षणी आरोपीने तरुणीच्या घरात प्रवेश केला. तिच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारून बेशुद्ध पडल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपी साधारण पाऊणतास घरामध्ये होता. तासाभरानंतर शुद्धीवर आल्यानंतर तरुणीने तिच्या ओळखीच्या शिक्षिकेला हा प्रकार सांगितला. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती दिली.

आरोपीच्या शोधासाठी दहा पथके रवाना
या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाब नोंदवला आहे. तरुणीची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी न्यायवैद्यक तपासणी पथक, श्वान पथकाला करण्यात आले होते. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. त्या आधारे आरोपीची ओळख पटविण्यात येत आहे. आरोपी हा २५ ते ३० च्या वयोगटातील असून त्याचा शोध घेण्यासाठी दहा पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त डॉ. शिंदे यांनी सांगितले.
ही तरुणी महाराष्ट्रातीलच असून एक वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहे. ती सध्या कल्याणीनगर येथील एका आयटी कंपनीत नोकरीस आहे. ती भावाच्या शिक्षणासाठी कोंढवा परिसरात राहत होती. भाऊ बाहेरगावी गेल्यामुळे ती घरी एकटीच होती. तरुणीच्या मोबाईलमध्ये एक छायाचित्र आढळले असून त्यात आरोपीने ‘मी पुन्हा येईन’ असे लिहिले आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास ते छायाचित्र व्हायरल करण्याची धमकीही दिली आहे.

सोसायट्यांमध्ये चिंतेचे वातावरण :
या घटनेमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनोळखी व्यक्तींना सहज प्रवेश मिळत असल्याने सोसायट्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोसायटीच्या सुरक्षारक्षकांची जबाबदारी, बाहेरून येणाऱ्या लोकांची नोंद करून घेणे आणि ओळख पटविण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com