सौर कृषी पंप बिघडल्यास ॲपवरून तक्रार करणे शक्य
पुणे, ता. ४ : राज्यात विविध योजनांमध्ये ५ लाख ६५ हजार सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत. सौर पंप बसविल्यानंतर त्यातील बिघाडाबाबतच्या तक्रारी मोबाइल अॅपवरूनही नोंदविण्याची सुविधा महावितरणने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांना सौर पंप बिघडल्यास यापूर्वी वेबसाइटवर तक्रार करणे, संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाइटवर तक्रार करणे किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून तक्रार करणे असे तीन पर्याय उपलब्ध करून दिले होते. आता मोबाइलवरील महावितरणच्या अॅपद्वारे तक्रार करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महावितरणचे मोबाइल अॅप लोकप्रिय ठरले असून, वीज ग्राहक त्याचा वापर वीज बिल जाणून घेणे, बिल भरणे यासह मीटर रीडिंग नोंदणी, वीज चोरी कळविणे, नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मरची माहिती कळविणे अशा विविध कामांसाठी करत आहेत. त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना या अॅपमध्ये ‘सौर पंप तक्रार’ यावर क्लिक करून सौर पंपाविषयी तक्रार दाखल करता येईल. तक्रार नोंदविताना शेतकऱ्याने सौर पंपाचा लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक लिहिणे गरजेचे आहे.
सौर कृषी पंप बसविल्यानंतर पंप बंद होणे, सौर पॅनेलची नासधूस होणे, सौर ऊर्जा संचात बिघाड होणे, सौर पॅनेल्सची किंवा पंपाची चोरी होणे अथवा पंपातून कमी दाबाने पाणी येणे अशा विविध तक्रारी शेतकरी करू शकतील. सौर पंप संचाचा विमा उतरविण्यात आला आहे.
शेतात सौर कृषी पंप बसविल्यानंतर पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर आहे. शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविल्यानंतर तीन दिवसांत तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक केले आहे. सर्व कंत्राटदारांना त्यांनी ज्या जिल्ह्यात पंप बसविले आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा केंद्र उभारणेही बंधनकारक आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण झाल्यावर त्यांना मोबाइलवर संदेश मिळेल. शेतकऱ्यांच्या तक्रारी व त्याच्या निराकरणाबाबत कंत्राटदार कंपन्यांच्या कामावर महावितरणच्या प्रत्येक मंडलाच्या अधीक्षक अभियंत्यांची देखरेख राहणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.