नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था
सौरभ ढमाले : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ५ : शहराला इतिहासाची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र, या परंपरेचे जतन करण्याऐवजी अनेक ठिकाणी त्याकडे गंभीर दुर्लक्ष होताना दिसते. याचेच प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे नवी पेठेतील पूना हॉस्पिटलजवळील श्रीमंत बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांची समाधी. मराठा साम्राज्याच्या वैभवाचा कळस पाहणाऱ्या या महान पेशव्यांची समाधी आज कचऱ्याने वेढली आहे.
समाधीच्या परिसरात ऐतिहासिक भित्तिचित्रे काढलेली असली तरी ती आज झाडाझुडपांनी आच्छादली गेल्याने भित्तिचित्रांची रया गेली आहे. कचरा, प्लॅस्टिक पिशव्या, सडलेले झाडांचे अवशेष आणि तुटलेल्या फांद्या जागोजागी विखुरलेल्या आहेत. परिसरात स्वच्छतेचा अभाव असून दुर्गंधीमुळे पर्यटक येथे थांबण्यासही धजावत नाहीत. या बाबत इतिहासप्रेमी नागरिकांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे समाधी परिसराच्या साफसफाईसाठी पाठपुरावा केला. मात्र, वरचेवर सफाई होते. त्यानंतर पुन्हा तेथे कचरा साठतो. तसेच येथे काही बेजबाबदार नागरिकांकडून रात्री मद्यपान देखील होते.
नानासाहेब पेशवे हे बाजीराव पेशव्यांचे ज्येष्ठ पुत्र. पुण्यात १७२१ मध्ये त्यांचा जन्म झाला. १७४० मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी पेशवाईची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडील अटक-पेशावरपासून पूर्वेकडील ओरिसा-बंगालपर्यंत झाला. त्यांच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मुघल बादशहाने मराठ्यांना हिंदुस्थानचे संरक्षक म्हणून मान्यता दिली. या काळात मराठ्यांनी दिल्लीवर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करून स्वराज्याचे स्वप्न बऱ्याच अंशी साकारले. नानासाहेब पेशव्यांनी मराठा साम्राज्याची घडी मजबूत केली. त्यांच्या पराक्रमाचे स्मरण करून देणारी ही समाधी मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण आहे, परंतु सध्या तिची दुरवस्था झाली आहे.
मराठा साम्राज्याच्या इतिहासात आणि पुणे शहराच्या जडणघडणीमध्ये नानासाहेब पेशव्यांचे मोलाचे योगदान आहे. परंतु आज त्यांच्या समाधीची झालेली दुरवस्था ही दुर्दैवी आहे. महापालिका प्रशासनाने समाधी परिसराची त्वरित साफसफाई करावी तसेच कायमस्वरूपी स्वच्छतेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
- उदय कुलकर्णी, इतिहास अभ्यासक व लेखक
प्रशासनातर्फे समाधीची त्वरित साफसफाई आणि डागडुजी करण्यात येईल. त्याचबरोबर आम्ही समाधीस्थळाची पाहणी करून तेथे प्रतिबंधात्मक देखभाल करण्याची व्यवस्था करू.
- रोहिदास गव्हाणे, अधीक्षक अभियंता, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.