भारतातील पहिला ‘डॉल्बी सिनेमा’ पुण्यात

भारतातील पहिला ‘डॉल्बी सिनेमा’ पुण्यात

Published on

पुणे, ता. ७ ः चित्रपटाचा सर्वोत्तम दृकश्राव्य अनुभव देणाऱ्या ‘डॉल्बी सिनेमा’ या तंत्रज्ञानाचा आविष्कार आता पुण्यात अनुभवता येणार आहे. खराडी येथील ‘सिटी प्राइड’मध्ये ‘डॉल्बी सिनेमा’ असणारे एक चित्रपटगृह सुरू झाले असून, या तंत्रज्ञानाचा अनुभव देणारे हे संपूर्ण भारतातील पहिलेच चित्रपटगृह ठरले आहे.
‘डॉल्बी सिनेमा’चा अनुभव देण्यासाठी खास त्या पद्धतीने हे चित्रपटगृह तयार करण्यात आले आहे. या चित्रपटगृहाची आतील बाजू संपूर्णपणे काळ्या रंगात असून ध्वनिक्षेपक प्रेक्षकांना दिसणार नाहीत, अशा पद्धतीने लावण्यात आले आहेत. येथील पडदाही ‘वक्राकार’ (कर्व्ड) असून उजव्या भिंतीपासून डाव्या भिंतीपर्यंत आणि जमिनीपासून छतापर्यंत उंचीचा हा भव्य पडदा आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले चित्रपटगृह ३१० आसन क्षमतेचे आहे.
याबाबत ‘सिटी प्राइड’चे भागीदार पुष्कराज चाफळकर म्हणाले, ‘‘डॉल्बी सिनेमाचे तंत्रज्ञान भारताबाहेर अनेक देशांमध्ये होते. त्या तंत्रज्ञानाचा अनुभव आम्ही दुबईला जाऊन घेतला; त्यावेळी हे भारतात आणण्याचा निश्चय केला. ओटीटी व्यासपीठांमुळे चित्रपटांसमोरील आव्हाने वाढत असताना लोकांना चित्रपटगृहात येण्यासाठी काहीतरी नवीन उत्साहवर्धक कारण दिले पाहिजे, असाही आमचा विचार होता. त्यातून हे शक्य झाले.’’
‘डॉल्बी सिनेमा’ या तंत्रज्ञानात तयार झालेले चित्रपट येथे आता पाहायला मिळणार आहेत. हॉलिवूडमधील बहुतांश चित्रपट या पद्धतीचे असून भारतातील काही चित्रपटही या तंत्रज्ञानानुसार तयार होणार आहेत. मात्र हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याने इतर चित्रपटगृहांच्या तुलनेत येथील तिकिटांची किंमत काहीशी अधिक असणार आहे.

‘डॉल्बी सिनेमा’ म्हणजे काय?
डॉल्बी या कंपनीने चित्रपटाचा सर्वोत्तम अनुभव घेण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान एकत्र करून ‘डॉल्बी सिनेमा’चा अनुभव तयार केला आहे. यात ‘डॉल्बी व्हीजन आणि ‘डॉल्बी ॲटमॉस’ अशा दोन सर्वोत्तम दृकश्राव्य तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ‘डॉल्बी व्हिजन’मुळे चित्रपटाच्या दृश्यातील रंग अधिक प्रखर आणि स्पष्ट दिसतात; तर ‘डॉल्बी ॲटमॉस’मुळे त्रिमितीय ध्वनी अनुभव मिळतो. यात प्रेक्षकांच्या प्रत्येक दिशेला ध्वनिक्षेपक असल्याने दृश्यात अपेक्षित असलेल्या बाजूने प्रेक्षकांना आवाज ऐकू येतो. या दोन्ही तंत्रज्ञानांच्या संगमाने प्रेक्षकांना प्रत्यक्ष चित्रपटांमधील प्रसंगांमध्ये उभे असल्याचा अनुभव येतो आणि दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेला चित्रपट जसाच्या तसा सादर होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com