‘निंबाळकर तालीम’तर्फे यंदा संभाजी महाराजांवर देखावा
पुणे, ता. ८ : धर्मवीर संभाजी महाराज यांचे बलिदान आणि त्यांचे कार्य पुढच्या पिढीला कळावे यासाठी सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवात ‘मृत्युंजय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावा सादर केला जाणार आहे, अशी माहिती सदाशिव पेठेतील आयोजित कार्यक्रमात मंडळातर्फे देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष राहुल कटके, कार्याध्यक्ष राघवेंद्र मानकर, देखावा सादरकर्ते गणेश लोणारे यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर निंबाळकर तालीम चौक येथे ढोल-ताशांच्या गजरात उपस्थितांच्या हस्ते जिरे टोप व भवानीमाता तलवारीची पूजा, गणपतीची आरती व देखाव्याचे अनावरण केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधन मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, मंडळाचे आधारस्तंभ दीपक मानकर, आमदार हेमंत रासने, कलादिग्दर्शक विनायक रासकर व विवेक खटावकर यांच्यासह आदी उपस्थित होते. केदार गोराडे यांनी सूत्रसंचालन केले. विराज तावरे यांनी आभार मानले.