भाजप कार्यकर्त्यांमध्ये गुंतवणूक करणारा पक्ष

भाजप कार्यकर्त्यांमध्ये गुंतवणूक करणारा पक्ष

Published on

पुणे, ता. १२ : ‘‘भाजपमध्ये कार्यकर्त्याची क्षमता बघून त्याला संधी दिली जाते. हा पक्ष भविष्यातील नेतृत्व घडविण्यासाठी गुंतवणूक करणारा एकमेव पक्ष आहे. भाजपमध्ये पुढच्या २० वर्षांचे नेतृत्व तयार होत आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
केंद्रीय नागरी हवाई व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन, एक वर्षाच्या कार्याचा अहवालाचे आणि ‘प्रथम माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले, तसेच रुग्णवाहिकेचे लोकार्पणही झाले.
बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, हेमंत रासने, योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारमधील विविध मंत्र्यांशी अनेकांशी संवाद साधला. त्यातून जागतिक वारसास्थळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश करण्याचा निर्णय झाला. पश्चिम घाट, जंगल, समुद्र किनारे या जागी अभूतपूर्व स्थापत्य शैली किल्ले विकसित करण्यात आले. जंजिऱ्यासारख्या किल्ल्याची बांधणी अचंबित करणारी आहे. आता मराठा आणि हिंदवी साम्राज्याचा इतिहास जागतिक स्तरावर पोहोचला आहे. जागतिक पर्यटक आणि अभ्यासकांसाठी ही ठिकाणे महत्त्वपूर्ण झाली आहेत. हा निर्णय झाल्यानंतर आज शिवाजी महाराजांच्या भूमीत येणे आनंददायी आहे.’’ 

मोहोळ म्हणाले, ‘‘खासदार म्हणून गेल्या एका वर्षात जे काम करता आले, ते मी अहवालातून सादर करत आहे. पुणेकरांच्या सेवेत खासदाराचे कार्यालय २४ तास सुरू राहील. पक्षनेतृत्वाचा विश्‍वास, कार्यकर्त्यांची साथ आणि पुणेकरांचा आशीर्वाद यामुळे मी केंद्रात काम करू शकत आहे. पुण्याला सर्वोत्तम बनविण्याचा माझा प्रयत्न आहे.’’
या वेळी चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांनी सूत्रसंचालन केले.


फडणवीस म्हणाले...
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मोहोळ यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक
- गिरीश बापट यांच्या निधनानंतर खासदार म्हणून सर्वानुमते मोहोळ यांचे नाव पुढे आले
- एकवेळ संधी हुकली म्हणजे पुन्हा संधी मिळत नाही असे नाही
- मी असो की चंद्रकांत पाटील... आम्हीही पूर्वी बूथवर काम करणारे कार्यकर्ते होतो
- पुण्यासाठी दुसरे (पुरंदर) विमानतळ लवकरच होणार

इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन
बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याने मोहोळ यांचे शक्तिप्रदर्शन झालेच. पण आगामी काही महिन्यांत पुणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. या कार्यक्रमाचे निमित्त साधून रंगमंदिर परिसरात इच्छुकांनी कार्यकर्त्यांसह हजेरी लावून शक्तिप्रदर्शन केले. अनेकांनी स्वागताचे फ्लेक्स लावून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com