राज्यात धरणसाठा ६० टक्क्यांवर
पुणे, ता. १३ ः राज्यात यावर्षी चांगला पाऊस होत असल्याने धरणसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या राज्यात जलसाठा ५९.१६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच काळात हा साठा अवघा २८.२८ टक्के होता. विशेषतः विदर्भात गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमध्ये भरपूर पाणीसाठा वाढला असून, काही धरणांतून विसर्गही सुरू आहे, तर पुणे विभागातील धरणसाठा हा सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी मे महिन्यात मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली. मॉन्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना नुकसानही सहन करावे लागले. मे आणि जून या दोन्ही महिन्यांत पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्यातील सर्वच धरणसाठ्यांत कमालीची वाढ झाली आहे. जुलैमध्ये पश्चिम महाराष्ट्रात जरी तीव्रता कमी झाली असली तरी विदर्भात जोरदार पाऊस होऊन काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली.
राज्यात सर्वाधिक धरणसाठा हा कोकण विभागात ७५.०६ टक्के एवढा झाला आहे, तर पुणे विभागातही पाणीसाठा हा ६९.५६ टक्के एवढा झाला आहे. सध्या नागपूर, अमरावती विभागात ४७ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये ४४ टक्के पाणीसाठा आहे. राज्यात गतवर्षीपेक्षा सध्या ३०.८८ टक्के अधिकचा पाणीसाठा उपलब्ध आहे.
दरम्यान, पुणे विभागामध्ये गतवर्षीपेक्षा ४२.६५ टक्के अधिक पाणीसाठा झाला आहे. यावर्षी नेहमीच्या वेळेपूर्वीच धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची हजेरी सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळे या भागातील धरणामध्ये पाणीसाठा वाढला आहे.
--------------------
खडकवासला प्रकल्पात २० टीएमसी पाणी
पुण्यातील खडकवासला प्रकल्पामध्ये २०.५७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे, म्हणजेच ७०.५६ टक्के धरणात उपयुक्त पाणीसाठा आहे. खडकवासला धरणप्रकल्पामध्ये टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला धरणांचा समावेश होतो. पुण्यातील कळमोडी धरण शंभर टक्के भरले आहे.
------------
राज्यातील एकूण धरणे - २,९९७
मोठी धरणे - १३८
मध्यम धरणे - २६०
लघू धरणे - २,५९९
------------------------
विभाग -- धरण -- धरणसाठा (टक्के)
(मोठी, मध्यम, लघू धरणे)
नागपूर -- ३८३ -- ४७.९२
अमरावती -- २६४ -- ४७.७७
छत्रपती संभाजीनगर -- ९२० -- ४४.६७
नाशिक -- ५३७ -- ५६.२९
पुणे -- ७२० -- ६९.५६
कोकण -- १७३ -- ७५.०६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.