शाई फेक करणाऱ्यावर ‘मकोका’ लावा विविध संस्था, संघटना आणि पक्षांच्या एकत्रित बैठकीत मागणी
पुणे, ता. १४ ः संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला. संबंधित व्यक्तींवर ‘मकोका’नुसार गुन्हा दाखल करावा तसेच जनसुरक्षा कायद्यानुसार संबंधित संघटनेवर कारवाईची मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच काहींनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली. त्यावर आंदोलनाबाबतचा अंतिम निर्णय हा समितीच्या बैठकीत घेणार असल्याचे सांगण्यात आले.
विविध संस्था, संघटना आणि पक्षांकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या निषेधार्थ सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर, माजी नगरसेवक श्रीकांत शिरोळे, मराठा महासंघाचे अजय पाटील, रवींद्र माळवदकर, बाळासाहेब दाभेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे, संजय मोरे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कुंजीर, लेखक श्रीमंत कोकाटे, शिवसंग्रामचे तुषार काकडे, रेखा कोंडे, प्रतिमा परदेशी, पैगंबर शेख आदी उपस्थित होते.
खेडेकर म्हणाले, ‘‘या घटनेतून आपण जागृत होऊन, पुढे जाऊन सगळे एकत्र होणार असू तर चांगले होईल. हे सगळे सकारात्मक पद्धतीने घेऊ. लढाई जिंकली की साजरे करण्यात आयुष्य जाते. त्यामुळे सतत लढाई करत राहिली पाहिजे. ही एक संधी समजू. आपण एकत्र येऊ, समविचारी संस्था, संघटना एकत्र येऊन काम करू. येथून नवीन क्रांती होईल अशी अपेक्षा ठेवतो.’’
शिरोळे म्हणाले, ‘‘आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, त्यानंतर तुम्हाला सांगितले जाईल. दोषी कोण आहे, हे शोधले पाहिजे.’’
जगताप म्हणाले, ‘‘जनसुरक्षा कायदा केला आहे, तर या संघटनेवर बंदी आणावी. जनसुरक्षा कायद्यातील पहिली कारवाई या संबंधित संघटनेवर कारवाई करावी.’’
‘‘ज्याला ज्या भाषेत कळते, त्याच भाषेत उत्तर द्या. व्यवसाय, पदाची प्रलोभने लाथाडण्याची ताकद ठेवा.’’ असे अरविंद शिंदे यांनी म्हटले.
पासलकर म्हणाले, ‘‘संबंधित व्यक्ती शिव विचारांचा नाही परंतु ते वेगळे पणाने दाखवण्यात आले. संभाजी ब्रिगेडकडून तरुण मुलांच्या डोक्यात विज्ञानवादी विचार दिले जातात. पुढील काळात त्याच भाषेत उत्तर दिले जाईल.’’
प्रशांत धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले तर यशवंत गोसावी यांनी आभार मानले.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.