अद्ययावत आपत्ती निवारण कक्ष
पुणे, ता. १३ ः पूरस्थिती किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीवेळी तत्काळ मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक महापालिकेचा आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित झाला आहे. नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, तंत्रज्ञान व मनुष्यबळाद्वारे सध्या संबंधित कक्ष २४ तास कार्यरत आहे, तर या कक्षाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम अद्याप शिल्लक आहे.
मुंबई महापालिकेचा आपत्ती निवारण कक्ष देशातील उत्कृष्ट कक्ष म्हणून ओळखला जातो. याच धर्तीवर पुण्यातही पूरस्थिती किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीवेळी प्रशासन सजग व्हावे, घटनेवर तातडीने नियंत्रण मिळवून नागरिकांना तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने मागील वर्षी पुणे महापालिकेतही अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्याची घोषणा मागील वर्षी करण्यात आली होती. मागील वर्षी खडकवासला धरणातून अचानक सोडल्यामुळे शहराच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अद्ययावत आपत्ती निवारण कक्षाची गरज निर्माण झाली होती.
दरम्यान, महापालिकेच्या जुन्या इमारतीमध्येच या कक्षाची निर्मिती करण्यास सुरवात झाली होती. या वर्षी जूनमध्येच संबंधित कक्षाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले होते, मात्र कक्ष सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व सोई-सुविधा, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने संबंधित कक्ष आता सुरू करण्यात आला आहे. उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व त्यांच्या अंतर्गत १९ जणांकडून तिन्ही पाळ्यांमध्ये कक्षाचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे पूरस्थितीसह कोणत्याही आपत्तीस तोंड देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त कक्ष सज्ज झाला आहे. या कक्षाच्या दुसऱ्या टप्प्यात सभागृहाचे काम होणार आहे. संबंधित सभागृह हे आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. अद्याप या सभागृहाचे काम सुरू झालेले नाही.
कक्षाची वैशिष्ट्ये
- आपत्ती निवारण कक्ष २४ तास सुरू
- १४०० सीसीटीव्ही कक्षाशी जोडले
- पोलिस, बिनतारी संदेश यंत्रणा, महापालिकेचे अधिकारी कक्षात उपस्थित
- दूरचित्रवाणी, बिनतारी संदेश यंत्रणा, इंटरनेट, लॅंडलाइन अशा विविध साधनांचा वापर
- हवामान केंद्रांद्वारे २४ तास निरीक्षण
मुंबईच्या धर्तीवर पुणे महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित झाला आहे. या कक्षासाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात सभागृहाचे काम होणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांसमोर मांडला जाणार आहे. त्यास परवानगी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल.
- गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पुणे महापालिका