पुणे स्थानकावर ‘ब्लॅक बॉक्स’ सारखी यंत्रणा स्थानक व्यवस्थापक, चालक व गार्ड यांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग होणार
प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १४ ः पुणे स्थानकासह विभागात आता विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’सारखी कम्युनिकेशन प्रणाली बसविण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानक, यार्ड, नियंत्रण कक्ष, क्रॉसिंग या सारख्या महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी स्थानक व्यवस्थापक अथवा मुख्य यार्ड व्यवस्थापक यांचे रेल्वे वाहतूक संदर्भात होणाऱ्या संवादाचे रेकॉर्डिंग होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासन स्थानकावर ‘नवीन व्हीएचएफ’ (अतिशय उच्च वारंवारतेवर चालणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी) यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचा एकमेकांसोबत होणारा संवाद हा जलद व स्पष्ट ऐकू येईल. शिवाय या संवादाचे रेकॉर्डिंगदेखील होणार आहे. एखादा अपघात अथवा घटना घडल्यास त्या आधारे तपास करणे सोपे होणार आहे. यासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पुणे रेल्वे विभागाने रेल्वे वाहतूक संदर्भात महत्त्वाच्या ठरणाऱ्या या नवीन ‘व्हीएचएफ’ प्रणाली बाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवला होता. त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली असून, लवकरच पुणे स्थानकावर व विभागातील अन्य स्थानकावर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. स्थानक व्यवस्थापकाच्या जवळ असलेल्या ‘वॉकी टॉकी’ सेट देखील अद्ययावत केले जाणार आहे. ‘व्हीएचएफ’ प्रणाली ही ३० ते ३०० मेगाहर्ट्झ (प्रति सेकंद निर्माण होणारी कंपने) त्यामुळे संवाद अधिक जलद व सुस्पष्ट होण्यास मदत मिळणार आहे. हे रेकॉर्डिंग सामान्यपणे तीन महिन्यांपर्यंत जतन केले जाणार आहे.
-----------------------
हे कसे काम करेल :
- ही यंत्रणा रेडिओ फ्रिक्वेन्सीवर आधारित
- वायरलेस संवाद प्रणाली
- रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये (लोको पायलट, गार्ड, स्टेशन मास्टर) यांच्यात त्वरित, स्पष्ट आणि सुरक्षित संपर्क साधण्यासाठी वापरली जाते.
- कर्मचाऱ्याकडे व्हीएचएफ रेडिओ सेट उपलब्ध असणार
-फ्रिक्वेन्सीवर आधारित संवाद
- यापूर्वी कधी रेकॉर्डिंग झालेले नाही पण आता रेकॉर्डिंग होणार
- रेडिओची रेंज सरासरी ५ ते १५ किलोमीटर.
- स्थानकाजवळ रेल्वे येताच संवादाचे रेकॉर्डिंग होणार.
----------------
मिळणारे फायदे
- वादळ, पाऊस, अडथळ्यांमध्येही आवाज नीट ऐकू येतो
-त्वरित संवाद
- स्पष्ट आवाज
- कमी वेळेत संपर्क
------------------
आपत्कालीन परिस्थितीत फायदेशीर
- रेल्वे अपघात, डबे घसरणे अशा आपत्कालीन परिस्थितीत संवाद साधणे सोपे होईल.
- रेल्वेचा अपघात झाल्यास त्याचा तपास करण्यासाठी रेकॉर्डिंग तपासणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
- यातून कोणत्या कारणामुळे अपघात झाला, चूक कोणाची याची अचूक माहिती मिळण्यास मदत.
-----------------
‘‘पुण्यासह विभागातील महत्त्वाच्या स्थानकावर ‘नवीन व्हीएचएफ’ यंत्रणा बसविली जाणार आहे. रेल्वे बोर्डाने याला नुकतीच मंजुरी दिली. येत्या काही दिवसात याचे काम सुरु होईल.
- पद्मसिंह जाधव, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.